उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी म्हणून करोडोच्या संख्येने भाविक येत आहेत. यात काही विदेशी भाविकांचाही समावेश असून त्यांना हिंदू धर्म, संस्कृती याविषयी आस्था आणि उत्सुकता असल्याचे दिसून येत आहे. जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळ्याचा अनुभव घेण्यासाठी म्हणून हे विदेशी भाविक भारतात येत आहेत. असेचं दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील आध्यात्मिक भक्त नरसिंह स्वामी हे २०२५ च्या महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी प्रयागराज येथे आले आहेत.
एएनआयशी बोलताना भक्त नरसिंह स्वामी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, “मी इथे कुंभमेळ्याला उपस्थित राहण्यासाठी आलो आहे. मी खूप वर्षांपूर्वी याबद्दल ऐकले होते, पण मला तेव्हा इथे येणं शक्य झालं नाही. कुंभमेळा हा एक असा सण आहे जिथे अमृत मिळवण्यासाठी अनेक संत आणि साधू एकत्र येत असतात. तारुण्यात असताना माझ्या मनात अनेक प्रश्न होते. त्यातील एक प्रश्न म्हणजे माझ्यासारख्या चांगल्या लोकांसोबत वाईट गोष्टी का घडतात?” असे त्यांनी एएनआयशी बोलताना सांगितले.
नरसिंह स्वामी पुढे म्हणाले की, सनातन धर्माच्या मदतीने त्यांनी कर्म, पुनर्जन्म आणि संसार या संकल्पना शोधून काढल्या. ते म्हणाले की, “जेव्हा मी सनातन धर्मात आलो, तेव्हा मला कर्म आणि पुनर्जन्म याविषयी माहिती मिळाली. जीवन हा एक अखंड प्रवास आहे आणि आपण आपले भूतकाळातील कर्म या जन्मात संपवायला आणतो. त्यामुळे आपण एका जीवन चक्रात आहोत, हे समजले. मला जाणून घ्यायचे होते की या संसारातून कसे बाहेर पडायचे.”
हे ही वाचा:
पकडला… सैफ हल्लाप्रकरणी एक संशयित ताब्यात
खराब कामगिरीनंतर बीसीसीआयची खेळाडूंवर १० नियमांची वेसण
तैवानच्या हद्दीत दिसली १३ चीनी विमाने, सात चीन नौदलाची जहाजे!
सैफ अली खानवर हल्ला अन पाकिस्तानला जखम, माजी मंत्री म्हणतो, भारतात मुस्लिम…
भक्त नरसिंह स्वामी यांचा जन्म १९५९ मध्ये झाला. ते इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतनाचे (ISKCON) दक्षिण आफ्रिकेतील पहिले संन्यासी आहेत. ते १९८६ मध्ये इस्कॉनमध्ये सामील झाले होते. इस्कॉनच्या मते, त्यांनी ९० च्या दशकाच्या सुरुवातीला बर्मिंगहॅम, ब्रिटन येथे पुस्तक वितरक म्हणून काम केले. त्यानंतर याचं दशकाच्या मध्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील मंदिरांमध्ये सेवा देखील केली. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून ते २००३ पर्यंत ते पूर्व आफ्रिका, केनिया आणि युगांडा येथे होते. २००५ मध्ये ते संन्यास उमेदवार बनले आणि २००८ मध्ये त्यांनी संन्यास आश्रमात दीक्षा घेतली.