मागच्या काही महिन्यांपासून भारतीय संघाचे प्रदर्शन फारसे चांगले नसून संघाला अपयशाचा सामना करावा लागत आहे. श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय मालिका, न्यूझीलंड विरुद्धची कसोटी मालिका आणि ऑस्ट्रेलियामधील बॉर्डर- गावस्कर मालिकेतील दारुण पराभव यानंतर भारतीय संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने कठोर पावले उचलली आहेत. संघात शिस्त आणि खेळाडूंमधील ऐक्य वाढवण्यासाठी बीसीसीआयकडून १० कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. या नियमांचे पालन न केल्याबद्दल खेळाडूंना दंड आकारला जाणार नसून आणखीही काही कारवाई करण्यात येणार आहे.
बीसीसीआयने सर्वच क्रिकेटपटूंसाठी देशांतर्गत क्रिकेट सामने खेळणं बंधनकारक केलं आहे. सर्व क्रिकेटपटूंना देशांतर्गत इकोसिस्टमशी जोडून ठेवणं हा यामागील मुख्य उद्देश आहे. सर्वच खेळाडूंना मॅचपासून ते प्रॅक्टिस सेशनपर्यंत एकत्र प्रवास करणं अनिवार्य केलं आहे. काही खास कारण असल्यास स्वतंत्र प्रवास करण्यासाठी हेड कोच, सिलेक्शन कमिटीच्या चेअरमनची परवानगी घ्यावी लागेल. दौऱ्यावर जाताना ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सामान असल्यास खेळाडूंना त्याचा खर्च स्वतः करावा लागेल. ३० दिवसापेक्षा जास्त अशा परदेश दौऱ्यासाठी खेळाडू १५० किलो वजन घेऊन जाऊ शकतात. तर, सपोर्ट स्टाफला ८० किलो वजन नेता येईल. ३० दिवसांपेक्षा कमी कालावधीच्या दौऱ्यासाठी १२० किलो वजनी सामान नेण्याची परवानगी असेल. तर, सपोर्ट स्टाफला ६० किलो वजन नेण्याची परवानगी असेल.
यापुढे कुठलाही खेळाडू सीरीज दरम्यान सोबत पर्सनल स्टाफ म्हणजेच शेफ, पर्सनल मॅनेजर, ट्रेनर, सेक्रेटरी किंवा असिस्टेंट घेऊन जाऊ शकत नाही. त्यासाठी बोर्डाची परवानगी लागेल. परदेश दौऱ्यांमध्ये खेळाडूंसोबत कुटुंबांना राहण्यासाठी बोर्डाने केवळ दोन आठवड्यांचा कालावधी मंजूर केला आहे. बंगळुरुमध्ये असलेल्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये खेळाडूंना व्यक्तीगत सामान, उपकरण पाठवण्यासाठी टीम मॅनेजमेंटशी चर्चा करावी लागेल. अतिरिक्त खर्च असल्यास स्वतःला खर्च करावा लागणार आहे. तसेच कुठल्याही दौऱ्यावर किंवा सीरीज दरम्यान वैयक्तिक जाहिराती शूट करु शकत नाहीत. बोर्डाच्या ऑफिशियल शूटला, प्रमोशनल कार्यक्रमाला खेळाडूंनी उपस्थित राहणं आवश्यक असणार आहे. सीरीज किंवा मॅच लवकर संपली, तर आयोजित केल्याप्रमाणेचं ट्रॅव्हल करावं लागेल. वेळेआधी संघ सोडून जाता येणार नाही.
हे ही वाचा:
तैवानच्या हद्दीत दिसली १३ चीनी विमाने, सात चीन नौदलाची जहाजे!
सैफ अली खानवर हल्ला अन पाकिस्तानला जखम, माजी मंत्री म्हणतो, भारतात मुस्लिम…
आतिशी, संजय सिंह यांच्याविरोधात काँग्रेसने थोपटले दंड!
सैफचा हल्लेखोर सीसीटीव्हीत दिसला, पायऱ्या उतरतानाचा व्हीडिओ
सर्व खेळाडूंनी मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करणे अपेक्षित असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. या नियमांचे पालन न केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते. बीसीसीआयने एखाद्या खेळाडूविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. संबंधित खेळाडूला इंडियन प्रीमियर लीगसह बीसीसीआय आयोजित सर्व स्पर्धांमध्ये भाग घेण्यापासून रोखले जाऊ शकते किंवा दंड आकाराला जाऊ शकतो.