अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर येथील शीख समाजाच्या वतीने गुरुद्वारा ब्रह्म कुंड साहिब येथे १९ जानेवारीपासून ते २१ जानेवारीपर्यंत ‘अखंड पाठा’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘प्राणप्रतिष्ठेचा सोहळा विनाअडथळा व्हावा, यासाठी देशभरातील विविध भागांमधील शीख समाज या ‘अखंड पाठा’मध्ये सहभागी होतील,’ असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आरपी सिंग यांनी सांगितले.
‘शीख, प्रभू राम आणि अयोध्या यांच्या संबंधाचा मोठा इतिहास आहे. गुरुनानक यांनी सन १५१०मध्ये राम मंदिराला भेट दिली होती. निहंग यांनीही सन १८५८ला राम मंदिराला भेट दिली होती आणि तिथे हवन केले होते. तसेच, मंदिर परिसरातील भिंतीवर ‘राम’ असे लिहिले होते. सर्वोच्च न्यायालयानेही हा पुरावा ग्राह्य धरला आहे,’ असे ते म्हणाले.
शीखधर्मीयांमध्ये ‘अखंड पाठ’ हा एक धार्मिक विधी असून त्याला एक गहन आध्यात्मिक महत्त्व आहे. यात शिखांचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिबचे अखंड पठण केले जाते. ४८ तासांहून अधिक काळ चालणारे हे पठण एका पथकाद्वारे केले जाते, जे या पवित्र ग्रंथाचे शब्द या सोहळ्याचा समारोप होईपर्यंत विनाअडथळा उच्चारत राहतात.
हे ही वाचा:
जगातील सर्वांत शक्तिशाली सैन्य अमेरिकेकडे; भारतीय लष्कर चौथ्या स्थानी!
भारतीय संघासाठी चांगली बातमी! ऋषभ पंतने दिले पुनरागमनाचे संकेत!
ज्यांच्यामुळे नेते सोडून गेले, त्यांच्याच हातून आज पक्ष निसटला!
राम लल्लाच्या तीन मूर्तींबद्दल चंपत राय यांनी दिले स्पष्टीकरण!
आरपी सिंग म्हणाले की, रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणी सन २०१९मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालापूर्वी ‘अखंडपाठ’ आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राम मंदिरावरील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वी आम्ही अयोध्येतील याच गुरुद्वारात ‘अखंडपाठा’चे आयोजन केले होते.
कानपूर, हैदराबाद, अमृतसर आणि देशांच्या इतर भागांतून शिखांनी भाग घेऊन राम मंदिराच्या उभारणीसाठी प्रार्थना केली. हा ‘अखंडपाठ’ प्राणप्रतिष्ठेसाठी आहे, आणि ‘राम’ हा शब्द गुरुग्रंथ साहिबमध्ये दोन हजार ५३३ वेळा वापरण्यात आला आहे,’ असे ते म्हणाले. ‘अखंड पाठ’ आयोजित करून, शीख समुदायाचे उद्दिष्ट केवळ आंतरधर्मीय एकता प्रदर्शित करणे नाही तर धर्माच्या सीमा ओलांडून विश्वास आणि अध्यात्माचा विजय साजरा करणेही आहे, असे त्यांनी सांगितले.