दिल्ली विधानसभा निवडणुका ५ फेब्रुवारीला पार पडणार असून निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. निवडणुकीच्या प्राश्वभूमिवर सर्वपक्ष जोर लावताना दिसत आहेत. आरोप-प्रत्यारोप, टीका, टिप्पणी नेत्यांकडून होत आहेत. याच पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू मित्रपक्ष भाजपसाठी दिल्लीत प्रचार करत आहेत. सोमवारी (३ फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत आम आदमी पार्टी सरकारवर निशाणा साधत खिल्ली उडवली. आपचा ‘अर्ध इंजिन सरकार,’ असा उल्लेख करत ‘आप सरकारचे मॉडेल हे अपयशी सरकारचे मॉडेल’ असल्याचा टोला मुख्यमंत्री नायडू यांनी लगावला.
प्रदूषणाच्या वाढत्या संकटासाठी आप प्रमुखांना जबाबदार धरत मुख्यमंत्री नायडू म्हणाले, “यमुना ही सर्वात प्रदूषित नदी आहे. १० वर्षात तुम्ही प्रदूषणावर नियंत्रण ठेवू शकले नाही. हे सर्व फक्त दुहेरी इंजिन सरकारच करू शकते.” दिल्ली आणि पंजाबमधील ‘आप’च्या कारभारावरही त्यांनी टीका केली आणि त्याच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
ते म्हणाले, वायू प्रदूषण आणि राजकीय प्रदूषण दोन्ही आरोग्यासाठी धोकादायक आहेत. दिल्ली सरकारचे १० वर्षांचे मॉडेल हे ‘अयशस्वी सरकार मॉडेल’ आहे. दिल्ली मॉडेलमध्ये पैसा येतो कुठून? पंजाब आणि दिल्ली या दोन राज्यांत आपची सत्ता आहे. हे पूर्णपणे अयशस्वी मॉडेल आहे. राजधानीतील पाण्याच्या गुणवत्तेचा संदर्भ देताना ते पुढे म्हणाले, “दिल्लीतील नाल्याचे पाणी आणि पिण्याचे पाणी यात फरक नाही.”
हे ही वाचा :
धार्मिक संघर्ष टाळण्यासाठी मुक्त विचार, आत्मनिरीक्षण महत्त्वाचे
अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर चीनच्या ‘बेल्ट ऍण्ड रोड’मधून पनामा बाहेर!
चीन, कॅनडा, मेक्सिकोनंतर युरोपियन युनियन ट्रम्प यांच्या निशाण्यावर
दिल्लीचे रस्ते कचऱ्याने भरलेले आहेत. कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणारा पहिला प्लांट दिल्लीत आहे. संपूर्ण पायाभूत सुविधा दिल्लीत आहे, तुम्ही काय केले? दिल्ली ही भारतीयांसाठी आशा आहे. करिअर करण्यासाठी लोक दिल्लीत यायचे. आता लोक करिअरच्या शोधात दिल्लीतून बाहेर पडत आहेत, ते पुढे म्हणाले.
केंद्रीय अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री नायडू म्हणाले, ‘हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक विकास देणारा आहे. हे जागतिक समुदायाला अन्न पुरवेल आणि महिलांचे सक्षमीकरण करेल. हा अर्थसंकल्प अधिक रोजगारावर भर देणारा आहे. केंद्रीय अर्थसंकल्प माझ्या विकासाच्या १० तत्त्वांशी जुळतो. सरकार सार्वजनिक धोरणाद्वारे समाज बदलू शकते. २०४७ पर्यंत भारतीय सर्वात श्रीमंत समुदाय बनणार आहे, त्याला कोणीही रोखू शकत नाही, असे मुख्यमंत्री नायडू यांनी म्हटले.