अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पनामा कालव्यावरील चिनी प्रभाव आणि नियंत्रणाबाबत वक्तव्य करत इशारा दिला होता. यानंतर आता पनामाकडून चीनच्या ‘बेल्ट ऍण्ड रोड इनिशिएटिव्ह’मधील (बीआरआय) सहभागाचे नूतनीकरण करणार नाही, असे अध्यक्ष जोस राउल मुलिनो यांनी स्पष्ट केले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्या भेटीनंतर त्यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. या निर्णयामुळे पनामा हा या उपक्रमातून माघार घेणारा पहिला लॅटिन अमेरिकन देश ठरला आहे.
पनामा कालव्याबाबत ट्रम्प यांच्या दबावादरम्यान, पनामाचे अध्यक्ष जोस राऊल मुलिनो यांनी म्हटले आहे की, त्यांचा देश चीनच्या महत्त्वाकांक्षी योजना ‘बेल्ट ऍण्ड रोड’चे नूतनीकरण करणार नाही. पनामा पायाभूत सुविधा प्रकल्पांसह नवीन गुंतवणुकीवर अमेरिकेसोबत काम करण्याचा प्रयत्न करेल, असेही ते म्हणाले. या भेटीमुळे नवीन संबंध निर्माण करण्याचे दरवाजे उघडले आहेत आणि पनामामध्ये शक्य तितकी अमेरिकन गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
चीनच्या ‘बेल्ट ऍण्ड रोड’ उपक्रमात योगदान देण्यासाठी पनामा आणि चीन यांच्यात एक व्यापक करार झाला होता. पनामा सुरुवातीला २०१७ मध्ये पूर्वीच्या प्रशासनाच्या नेतृत्वात सामील झाला होता. पण आता पनामाच्या राष्ट्राध्यक्षांच्या या घोषणेनंतर पनामा लवकरच चीनच्या या योजनेतून बाहेर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१३ मध्ये चीनने सुरू केलेल्या ‘बेल्ट ऍण्ड रोड’ने विविध देशांमधील पायाभूत सुविधा प्रकल्पांना वित्तपुरवठा करून जागतिक आर्थिक प्रभाव वाढवण्यासाठी बीजिंगसाठी एक प्रमुख यंत्रणा म्हणून काम केले आहे. पनामा २०१७ मध्ये माजी राष्ट्राध्यक्ष जुआन कार्लोस वरेला यांच्या कारकिर्दीत या उपक्रमात सामील झाला, ज्यामुळे पायाभूत सुविधांमध्ये वाढलेली चीनी गुंतवणूक सुरक्षित झाली.
हे ही वाचा :
चीन, कॅनडा, मेक्सिकोनंतर युरोपियन युनियन ट्रम्प यांच्या निशाण्यावर
अयोध्येतील सपाचे खासदार अवधेश प्रसाद धाय मोकलून रडले, पण एकही अश्रु ओघळला नाही!
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी पेरलेला २५ किलो आयईडी सुरक्षादलाकडून नष्ट!
‘गेल्या दोन महिन्यांतील अखिलेश यादव यांचे ट्विट बघा, महाकुंभला फक्त विरोध दिसेल’
पनामा कालव्याला का आहे महत्त्व?
पनामा कालव्याला जगभरात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ८२ किलोमीटर लांबीचा हा कालवा अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागराला जोडतो. जगातील साधारण ६ टक्के सागरी व्यापार याच कालव्यातून होतो. हा कालवा अमेरिकेसाठी खूप महत्त्वाचा आहे. अमेरिकेचा जवळपास १४ टक्के व्यापार पनामा कालव्यातून होतो. पनामा कालव्यातून अमेरिकेबरोबरच दक्षिण अमेरिकन देशांचीही मोठ्या प्रमाणात आयात- निर्यात होते. आशियातून कॅरेबियन देशात माल पाठवायचा असेल, तर जहाजे पनामा कालव्यातून जातात. पनामा कालव्यात काही समस्या निर्माण झाल्यास जगाची पुरवठा साखळी विस्कळीत होण्याचा धोका आहे, यामुळे याला अत्यंत महत्त्व आहे. या कालव्याचे बांधकाम १८८१ साली फ्रान्सने सुरू केले होते, परंतु १९०४ मध्ये अमेरिकेने हा कालवा बांधण्याची जबाबदारी घेतली आणि १९१४ मध्ये या कालव्याचे बांधकाम पूर्ण केले. यानंतर पनामा कालव्यावर अमेरिकेचे नियंत्रण होते, परंतु १९९९ मध्ये अमेरिकेने पनामा कालव्याचे नियंत्रण पनामा सरकारकडे दिले. हे आता पनामा कालवा प्राधिकरणाद्वारे व्यवस्थापित केले जाते. मात्र, यावर आता काही प्रमाणात चीनचा प्रभाव दिसू लागल्याने अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे.