अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर २५ टक्के आणि चीनवर १० टक्के अतिरिक्त कर लादण्याची घोषणा केल्यानंतर आता त्यांच्या निशाण्यावर युरोपियन युनियन असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे आणखी एक व्यापार युद्ध पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ट्रम्प यांनी दिलेल्या संकेतानंतर युरोपियन युनियननेही स्पष्ट केले आहे की, जर अमेरिकेने अतिरिक्त शुल्क आकारले तर ते याला खंबीरपणे प्रतिसाद देतील.
ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांनी डोनाल्ड ट्रम्प यांना युरोपियन युनियनवर अतिरिक्त शुल्क लादण्यासाठीची योजना विचारली असता त्यांनी उत्तर दिले की, “मी युरोपियन युनियनवर शुल्क लादणार आहे का? तुम्हाला खरे उत्तर हवे आहे की राजकीय उत्तर? नक्कीच. युरोपियन युनियनने आम्हाला खूप वाईट वागणूक दिली आहे,” असे म्हणत त्यांनी युरोपियन युनियनवर लवकरच अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत.
२०१८ मध्ये व्हाईट हाऊसमधील त्यांच्या पहिल्या कार्यकाळात, ट्रम्प यांनी युरोपियन स्टील आणि ॲल्युमिनियमच्या निर्यातीवर शुल्क लादले होते. याला प्रत्युत्तर म्हणून युरोपियन युनियनला व्हिस्की आणि मोटारसायकलींसह अमेरिकन वस्तूंवर अतिरिक्त शुल्क आकारण्यास प्रवृत्त व्हावे लागले होते. आता अमेरिकेने दिलेल्या इशाऱ्यानंतर युरोपियन युनियननेही याला खंबीरपणे आव्हान देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
रविवारी, युरोपियन कमिशनच्या प्रवक्त्याने म्हटले की, कॅनडा, मेक्सिको आणि चीनवर शुल्क लादण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाबद्दल युरोपियन युनियन खेद व्यक्त करत आहे. हे शुल्क अनावश्यक आर्थिक व्यत्यय निर्माण करतात आणि महागाई वाढवतात. ते सर्व बाजूंना त्रासदायक आहेत. युरोपियन युनियनच्या वस्तूंवर अन्यायकारकपणे किंवा अनियंत्रितपणे टॅरिफ लादणाऱ्या कोणत्याही व्यापार भागीदाराला युरोपियन युनियन ठामपणे प्रतिसाद देईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. प्रवक्त्याने पुढे असेही सांगितले की, युरोपियन युनियन मजबूत, नियम-आधारित व्यापार प्रणालीमध्ये वाढ आणि आर्थिक स्थिरता वाढवण्यासाठी, कमी शुल्कासाठी वचनबद्ध आहे. तसेच अमेरिकेसोबतच्या व्यापार आणि गुंतवणुकीच्या संबंधांसाठी युरोपियन युनियनच्या वचनबद्धतेचाही त्यांनी पुनरुच्चार केला. दोन्ही बाजूंनी हे संबंध अधिक मजबूत करण्याचा विचार केला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा :
अयोध्येतील सपाचे खासदार अवधेश प्रसाद धाय मोकलून रडले, पण एकही अश्रु ओघळला नाही!
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी पेरलेला २५ किलो आयईडी सुरक्षादलाकडून नष्ट!
‘गेल्या दोन महिन्यांतील अखिलेश यादव यांचे ट्विट बघा, महाकुंभला फक्त विरोध दिसेल’
मुस्लिम टोळीकडून हिंदूंच्या नावाचा वापर, मुलींना फसवून वेश्या व्यवसायात ढकलण्याचे काम
चीन, कॅनडा आणि मेक्सिकोला ट्रम्प यांचा दणका
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर २५ टक्के आणि चीनवर १० टक्के अतिरिक्त कर लादण्याची घोषणा केली. यामुळे या तीनही देशांना मोठा दणका ट्रम्प यांनी दिलेला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘एक्स’ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, हे शुल्क अमेरिकन लोकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे. ट्रम्प यांनी तिन्ही देशांवर ‘फेंटानिल’चे बेकायदा उत्पादन आणि निर्यात रोखण्यासाठी तर, कॅनडा आणि मेक्सिकोवर अमेरिकेत बेकायदा स्थलांतर थांबवण्यासाठी दबाव आणला.