38 C
Mumbai
Monday, April 29, 2024
घरराजकारणअहमद पटेल, व्होरांनंतरची काँग्रेस...

अहमद पटेल, व्होरांनंतरची काँग्रेस…

Google News Follow

Related

अहमद पटेल आणि मोतीलाल व्होरा या बुजुर्ग काँग्रेस नेत्यांचे निधन झाल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राजकारणाच्या पटावर गांधी घराण्यासाठी शह-काटशहाचे खेळ खेळणारे हे नेते गमावल्यामुळे काँग्रेससाठी येता काळ अधिकच खडतर असेल.

काँग्रेसचे ‘कठीण समय येता कोण कामास येतो?’, या प्रश्नाचे उत्तर काँग्रेससाठी गेल्या अनेक वर्षांपासून अहमद पटेल हेच होते. गुजरातमधल्या एका छोट्या गावातून दिल्लीचे राष्टीय राजकारण व्यापून टाकणारा अहमद पटेलांचा प्रवास थक्क करणारा होता. त्यांची कार्यपदधती विलक्षण होते. एक ‘गूढ व्यक्तिमत्व’ असणारे अहमद पटेल नुकतेच निर्वतले. काँग्रेसची प्रकृती अगोदरच ‘तोळामासा’ झालेली असताना, ‘आधीच उपवास त्यात फाल्गुन मास’ काँग्रेस अनुभवत असताना पटेल यांच्या जाण्याने काँग्रेसची मोठी हानी झाली आहे. २०१४ मधल्या मोदी लाटेच्या तडाख्यातून काँग्रेसचा तारू अजून सावरलेले नाही. दिल्लीच्या राजकारणात अगदी नवखे असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्पावधीत सरकार आणि प्रशासनावर पकड मजबूत केली असताना काँग्रेसचे नेतृत्व अद्यापि चाचपडत असल्याचे दिसते आहे.

काँग्रेसच्या भरकटलेल्या तारूला ‘किना-या’ला लावणे ही आज तरी अशक्यप्राय गोष्ट दिसते आहे, परंतु क्षयी झालेल्या काँग्रेस पक्षाला जिवंत ठेवण्याची क्षमता अहमद पटेलांसारख्या नेत्यामध्ये नक्कीच होती. आता असे ‘कुशल रणनितीकार’ नसल्याने काँग्रेसचा पाय अधिक गर्तेत जाण्याची चिन्हे आहेत.

 

पटेलांचे योगदान

 

अहमद पटेल म्हणजे दिल्लीच्या राजकारणातले एक ‘समांतर सरकार’ होते. हा माणूस रात्रभर काम करून सरकार चालवायचा. दिवसाउजेडी मनमोहनसिंगांचा चेहरा कांगेसप्रणित युपीएचे पंतप्रधान म्हणून काम पहायचे. मात्र, ते केवळ ‘रबर स्टॅम्प’ पंतप्रधान होते. रात्री अहमद पटेल हिरव्या पेनाने महत्वाच्या फाईली क्लिअर करायचे. त्यावेळचे पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व सुरेश पचौरी हे ‘दस जनपथ’वर ही फाईल घेऊन मध्यरात्री जायचे. मॅडम सोनिया गांधी यांनी संमती दर्शविल्यावर तो निर्णय फायनल व्हायचा. दुस-या दिवशी अहमद पटेल निद्रावस्थेत असताना सकाळी मनमोहनसिंग तो निर्णय अधिकृतपणे जाहीर करायचे. मंत्रिमंडळाची रचना, कोणत्या राज्यात कोणाला मुख्यमंत्री करायचे. निर्णय काय घ्यायचे, ही सगळी व्यूहरचना अहमद पटेल ठरवायचे. प्रणब मुखर्जीं खेरीज इतर कोणत्याही नेत्याला यात ‘से’ नसायचा. मनमोहनसिंग सरकारवरच्या विश्वासदर्शक ठरावावेळी कांगेसची सरशी झाली ती निव्वळ अहमद पटेलांच्या मुत्सद्दीपणामुळे. महाराष्टातील अनेक राजकीय स्थित्यंतराचे ते साक्षीदार राहिले. राजकीय आश्वासन देऊनही नारायण राणेंना कांगेसने मुख्यमंत्री का केले नाही? याचे उत्तर केवळ अहमद पटेलांपाशी होते. आता पटेलांसोबतच या रहस्याचीही अखेर झाली आहे. प्रश्न कोणताही असो त्याचे अचूक उत्तर अहमद पटेलांकडे असायचे. पक्षासाठी निधी उभारणे. कार्पोरेटस, बालिवूडसोबतचे उत्तम संबंध या अहमद पटेलांच्या जमेच्या बाजू. दिल्लीतील गांधी घराण्यानंतरचा सर्वात ताकदवान नेता असा लौकीक असूनही ते नेहमीच पडद्याआड राहीले.

 

२०१४ मध्ये नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर आल्यापासून तो पराभवाचा धक्का कांगेस अजून पचवू शकलेली नाही. कांगेस गेल्या सहा वर्षात भरकटलेली आहे ते पाहता पक्षाचे भवितव्य चिंताजनक असेच आहे. सोनिया गांधींचे वाढते वय, राहुल गांधी यांचे खुशालचेंडू नेतृत्व, प्रियंका गांधींचा पडत नसणारा प्रभाव, ज्यांना गल्लीतही जनाधार नाही अशा राजीव सातव, वेणुगोपाळ यांच्यासारख्या फुटकळ नेत्यांचा राहुल यांच्याभोवतीचा गराडा यामुळे काँग्रेसच्या भवितव्यावर मोठे प्रश्नचिन्ह आहे. काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबांधणी करण्याबाबत मध्यंतरी २३ नेत्यांनी एकत्र येऊन बाँब टाकला होता. हे बंड अजून शमलेले नाही. बिहारच्या विधानसभा निवडणूकीत व हैद्राबादच्या महापालिका निवडणूकीत काँग्रेसची झालेली दयनीय अवस्था त्या पक्षाची स्थिती सांगण्यासाठी पुरेशी आहे. गुजरातमध्ये कांगेसचा सुफडा साफ होऊनही राहुल गांधी राजीव सातवांना पुन्हा अभय देत असतील तर काँग्रेस संपविण्यासाठी नरेंद्र मोदी व अमित शाह यांची गरजच भासणार नाही. ठिकठिकाणी अशा हवशाहवशांची चलती आहे. मुकूल वासनिक यांच्यासारख्या मर्यादीत वकुब आणि कोणासाठीही उपलब्ध नसलेल्या नेत्याकडे काँग्रसने महत्वाची जबाबदारी दिली आहे. हरियाणात कोणतेही स्थान नसलेल्या रणजित सुरजेवालांकडे मीडियाची जबाबदारी आहे. त्या त्या राज्यातल्या ‘मासबेस’ असलेल्या नेत्यांना डावलून अगदीच फुटकळ नेत्यांना मोठे करण्याकडे राहुल गांधींचा एकंदरीत कल दिसतो. इंदिरा गांधीही ‘मास लीडर’चे पंख छाटत मात्र, त्या तोडीचा दुसरा नेता तयार करत. काँग्रसमध्ये नेता तयार करण्याची प्रकिया केंव्हाचीच संपली आहे. जे काही नेते येतात ते घराणेशाहीतून. घराणेशाहीला देशातली जनता कंटाळली आहे हे जनतेने वारंवार दाखवून दिले आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह, नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेते कोणताही घराणेशाहीचा वारसा नसताना पुढे आले. ते लोकांना अपील होते. किंबहुना आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल नौटंकी वगैरे असले तरी ‘सेल्फ मेड’ नेते आहेत. अशाच नेत्यांकडे नेतृत्व देण्याकडे जनमानसाचा कौल आहे. काँग्रेससाठी रात्रंसदिवस मेहनत करणारे अहमद पटेल आणि अगदी सुट्टीच्या दिवशी ‘२४ अकबर रोड’ या कांगेस मुख्यालयात शिपाई जरी आला नाही तरी नित्यनेमाने येऊन आपले काम करणारे मोतिलाल व्होरांसारखे समर्पित नेते आता नाहीत. व्होरा वयोमानाने बाजूला पडले होते. परतुं अखेरच्या श्वासापर्यंत ते सक्रीय होते. संसदेतही ते बोलायला उभे राहायचे आणि जुन्या आठवणींमध्ये रंगून जायचे. गतकाळातील आठवणी, नेत्यांमध्ये असलेला संवाद अशा विषयांवर ते बोलत असत. पटेलां पाठोपाठ त्यांचेही निधन झाले. व्होरा आणि पटेलांची निष्ठा कायम गांधी घराण्यावर राहीली. देशाला त्यांचा किती उपयोग झाला हा विषय वादाचा असला तरी राजकारणाच्या पटावरील ते महत्वाचे मोहरे होते हे नि:संशय. गांधी घराण्याला निष्ठा नव्या पिढीतील घराणेशाहीतून पुढे आलेले नेते केवळ निवडणूकीपुरते सिरियस असतात. याउलट मोदी-शांहसारखे नेते २४ तास दिलेल्या जबाबदारीचा विचार करतात. १८-१८ तास काम करतात, सतत लोकांच्या, कार्यकर्त्यांच्या संपर्कात असतात, तज्ज्ञांकडून इनपुट घेत असतात.  राहुल गांधीचे वर्तन नेमके या विरुद्ध आहे. संसदेचे अधिवेशन असताना महत्वाचे मुद्दे देशात तापलेले असताना राहुल गांधी विदेशात जाणार असतील तर जनता त्यांना नेता म्हणून कसे स्वीकारेल? अलिकडेच शेतकरी आंदोलनाचा विषय तापला असताना राहुल गांधी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी इटलीत निघून गेले. या मुद्यावर कोणी तोंड उघटले तर पक्षातील कवडीदमडीचे चाटुकार त्यांचा पाणउतारा करायला तयार असतात. मात्र,  पक्षात याबाबत विचार होताना दिसत नाही. राहुल गांधी यांना पक्षांतर्गत स्पर्धा नको म्हणून सचिन पायलट, ज्योतिरादित्य सिंधियांचे पंख छाटले गेले. त्याचे पर्यावसान सिंधिया भाजपावासी झाले तर पायलट आणि मिलिंद देवरा कधीही हातात कमळ घेऊ शकतात अशी परिस्थिती आहे. काँग्रेसने वयाच्या चाळीशीच्या आत पायलट, सिंधिया, देवरा या मंडळींना देशाचे मंत्री बनवले हे खरेच मात्र, आता ही मंडळीच काँग्रेसकडे का पाठ फिरवत आहे, याचा विचार व्हायला हवा. हायकमांडच्या मानसिकतेतून आणि विशिष्ट कोंडाळ्यातून बाहेर येऊन राहुल गांधी राजकारण करू शकत नाहीत हे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. राहुल यांनी काहीही चुका केल्या तरी त्या निस्तरायला आता अहमद पटेल नाहीत की व्होरा नाहीत, याची जाणीव त्यांनी ठेवायला हवी. काँग्रेसमधला ‘लीडरशीप क्रायसेस’ संपताना दिसत नाही. त्यामुळे २०१९ पेक्षाही कांगेसची अवस्था २०२४ मध्ये दारूण होऊ शकते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा