गुवाहाटी उच्च न्यायालयाने काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज आज शुक्रवारी फेटाळला. हा अर्ज हिमंता बिस्वसरमा यांच्या पत्नी रिनिकी भुयान सरमा यांनी दाखल केलेल्या एफआयआर संदर्भात होता, ज्यामध्ये अनेक पासपोर्ट बाळगल्याच्या आरोपांचा समावेश आहे.
न्यायमूर्ती पार्थिवज्योती सैकिया यांच्या खंडपीठाने २१ एप्रिल रोजी दोन्ही बाजूंची सविस्तर सुनावणी केल्यानंतर निकाल राखून ठेवला होता. सविस्तर आदेश अद्याप येणे बाकी आहे.
खेरांच्या वतीने वरिष्ठ वकील अभिषेक मनु संघवी यांनी युक्तिवाद केला की, मुख्यमंत्री हिमंत बिस्वसरमा यांची भूमिका राजकीय सूडबुद्धीने प्रेरित आहे, विशेषतः आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर. “मुख्यमंत्री सतत दबाव टाकत असताना याचिकाकर्त्याला निष्पक्ष वागणूक कशी मिळेल?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांनी हेही सांगितले की खेरा फरार होण्याचा धोका नाही आणि त्यांना अटक करण्याची गरज नाही.
वरिष्ठ वकील के.एन. चौधरी यांनीही हेच मत मांडले आणि आरोपांना बदनामीकारक असल्याचे म्हटले. “आरोपांची मांडणी पाहता ते जाणीवपूर्वक द्वेषाने केलेले आहेत,” असे त्यांनी सांगितले. त्यांनी हेही नमूद केले की हा जास्तीत जास्त गुन्हेगारी बदनामीचा विषय आहे, जो खासगी तक्रारीद्वारे हाताळला जाऊ शकतो.
दुसरीकडे, आसामचे ऍडव्होकेट जनरल देवाजित लोन सैकिया यांनी जामीनाला विरोध केला. त्यांनी सांगितले की हा साधा बदनामीचा प्रकार नाही, तर बनावट कागदपत्रे तयार करणे, फसवणूक आणि बनावटगिरी यांसारखे गंभीर गुन्हे यात समाविष्ट आहेत.
हे ही वाचा:
बारामती–राहुरी पोटनिवडणूक; ५५% पेक्षा अधिक मतदान
मायक्रोसॉफ्टकडून कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती ऑफर
मी तिकीट काढून फक्त सचिनसाठी बसेन!
प. बंगालमध्ये भाजप सरकार आणा; प्रत्येक घुसखोराला हद्दपार करू!
पार्श्वभूमी
तेलंगणा उच्च न्यायालयाने १० एप्रिल रोजी खेरांना एक आठवड्याचा ट्रान्झिट अटकपूर्व जामीन दिला होता आणि संबंधित न्यायालयात अर्ज करण्याची परवानगी दिली होती. यानंतर आसाम पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल केली. १५ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्या जामीनावर स्थगिती दिली.
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, खेरांनी आसाममधील संबंधित न्यायालयात जामीनासाठी अर्ज केल्यास त्यांच्या अर्जावर या आदेशाचा विपरीत परिणाम होणार नाही. तसेच ट्रान्झिट जामीन वाढवण्याची खेरांची मागणीही फेटाळली गेली.या पार्श्वभूमीवर खेरांनी गुवाहाटी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता, जो आता फेटाळण्यात आला आहे.
एफआयआरमधील कलमे
हा एफआयआर गुवाहाटी येथील क्राइम ब्रांच पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध कलमांखाली नोंदवण्यात आली आहे, ज्यामध्ये: निवडणुकीसंदर्भात खोटी माहिती देणे, फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे, बदनामी, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान यांचा समावेश आहे.
खेरांनी दावा केला आहे की रिनिकी भुयान सरमा यांच्याकडे तीन पासपोर्ट आहेत. दरम्यान, आसाम पोलिसांनी याआधी हैदराबाद आणि दिल्ली येथे खेरांच्या राहात असलेल्या ठिकाणी शोध मोहीमही राबवली होती. पवन खेरा हे काँग्रेस पक्षाच्या मीडिया आणि प्रचार विभागाचे अध्यक्ष असून ते काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य आहेत.







