काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली होती. मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनीही भूमिका मांडत काँग्रेसने एकला चलोचा नारा का दिला याचे कारण देत भूमिका स्पष्ट केली होती. मात्र, आता परत कॉंग्रेसने युटर्न मारल्याचे चित्र आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मनसेसोबत जुळवून घेण्याविषयीचे संकेत दिले आहेत. विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, सत्याचा मोर्चा हा मतचोरी संदर्भात होता. लोकशाही वाचवण्यासाठी होता. शरद पवार यांनी आपण आघाडीत लढलो पाहिजे ही भूमिका मांडली आहे, भाजपला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे अशी आमची ही भूमिका आहे. आम्ही त्यासंदर्भात सकारात्मक आहोत, असे वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
सत्याच्या मोर्चात महाविकास आघाडीसह मनसेने सुद्धा हिरारीने सहभाग घेतला. इतकेच काय, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनीच या मोर्चासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अनुपस्थितीत असले तरी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे आता भाजपला महापालिका निवडणुकीत रोखण्यासाठी सर्वांनीच एकत्र येण्याचा सूर आळवल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा:
मुर्शिदाबादला बाबरी मशीद बांधण्याचा तृणमूल आमदाराचा दावा
कोचमध्ये शिजवले नूडल्स, रेल्वे प्रशासनाच्या संतापाला उकळी
“ती चूक होती आणि आता…” NAAC च्या नोटीसला अल- फलाह विद्यापीठाने काय दिले उत्तर?
मालवणी पॅटर्नवरून मंत्री मंगलप्रभात लोढांना अस्लम शेखची धमकी
मुंबईतील स्थानिक नेत्यांनी मनसेसोबत न जाण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाला कळवला होता. मुंबईत चिंतन शिबिर झाल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला. तर खासदार वर्षा गायकवाड यांनी मारहाण करणाऱ्या, गुंडागर्दी करणाऱ्यांसोबत आमचा पक्ष कधीही जाणार नाही अशी भूमिका जाहीर केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही त्याला दुजोरा दिला. पण विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार यांच्या भूमिकेला पाठिंबा देत मनसेसोबत जुळवून घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे कॉंग्रेसमध्येच दोन मत प्रवाह असल्याचे दिसून येत आहे.







