“आमचे राजकारण तोडण्यासाठी नव्हे, तर जोडण्यासाठी”

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरे गटावर निशाणा

“आमचे राजकारण तोडण्यासाठी नव्हे, तर जोडण्यासाठी”

ठाकरे गटाला आणखी एक राजकीय धक्का देत विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी मंगळवारी (३० जून) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर महायुतीच्या वतीने विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या राजकीय घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.

उपसभापतीपदाचा अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे आणि सचिन अहिर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिंदे म्हणाले, “गेल्या आठवड्यात सहा खासदार आमच्यासोबत आले होते, तो एक षटकार होता. आता सचिन अहिर यांच्या प्रवेशामुळे आणखी एक षटकार लागला आहे. चौकार-षटकारांची ही मालिका अजूनही सुरूच आहे.”

सचिन अहिर यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना शिंदे म्हणाले की, तळागाळातील कार्यकर्ता म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख आहे. महायुतीने त्यांना विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी दिली असून, उद्या प्रस्तावाद्वारे त्यांची निवड होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “ते केवळ मुंबईपुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे उपसभापती म्हणून काम करतील. त्यांच्या आगमनामुळे मुंबईतील कामगार क्षेत्रात शिवसेनेची ताकद आणखी वाढेल. शिवसेना हा कार्यकर्त्यांना संधी देणारा पक्ष आहे. मुख्यमंत्री असतानाही मी स्वतःला कार्यकर्ताच मानून काम केले,” असेही ते म्हणाले.

यावेळी २०२२ मधील राजकीय घडामोडींचाही उल्लेख करत शिंदे म्हणाले, “३० जून ही तारीख माझ्यासाठी विशेष आहे. याच दिवशी माझा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला होता. हा केवळ योगायोग आहे. महाविकास आघाडीच्या काळात विकासकामांचा वेग मंदावला होता. मात्र महायुतीच्या सरकारनंतर महाराष्ट्राने सर्वच क्षेत्रांत वेगाने प्रगती केली आहे.”

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “गेल्या आठवड्यात सहा खासदारांनी आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला. लाखो मतदारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आपल्या नेतृत्वाने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, अशी अपेक्षा असते. आम्ही कुणाला तोडण्यासाठी नाही, तर जोडण्यासाठी राजकारण करत आहोत. सकारात्मक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत.”

हे ही वाचा:

‘ऑपरेशन टायगर’; सचिन अहिर पण आले शिवसेनेत

प्रचंड लाटा, जोरदार वाऱ्यांच्या तडाख्यात अडकली बोट, ६ मच्छिमार वाचले

पाकिस्तानला FATFच्या ‘ग्रे लिस्ट’मध्ये आणण्यासाठी भारत सज्ज

“मोदी झोपत नाहीत”; राजदूत सर्जिओ गोर यांनी सांगितला ट्रम्प यांचा किस्सा

उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत शिंदे म्हणाले, “लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघाचा विकास हवा असतो. मतदारांना न्याय देण्यासाठी ते निर्णय घेत आहेत. मात्र एखादा नेता पक्ष सोडून गेला की काही लोक त्याच्यावर टीका करतात. स्वतःचा माणूस असेपर्यंत तो चांगला आणि दुसरीकडे गेला की त्याच्यावर टीका करण्याची प्रवृत्ती दिसते. त्यावर मला अधिक बोलायचे नाही. आम्ही मात्र विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जात आहोत आणि त्याच मार्गाने काम सुरू ठेवणार आहोत.”

Exit mobile version