जालना येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर सोमवारी आरक्षणासंदर्भात उपसमितीची सह्याद्री विश्रामगृहावर चर्चा झाली आणि त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील शांतता भंग करू इच्छिणाऱ्यांपासून सावध राहण्याची विनंती आंदोलकांना केली. आपण मराठा आरक्षणाच्या बाबत सकारात्मक आहोत. आम्ही याबाबत उच्चस्तरीय समितीची बैठक घेतली. आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याशीही बोललो आहोत. सरकार तुमच्या मागणीवर गांभीर्याने विचार करत असून त्यासाठीच मंत्री व काही प्रमुख नेत्यांना तिथे पाठवल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूनेच आहे. सरकार त्याबाबतीत कुठेही मागे राहणार नाही. फक्त मराठा समाजाने संयम राखला पाहिजे. मराठा समाज पुढारलेला आहे पण आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास आहे. ते सर्वोच्च न्यायालयात सिद्ध करावे लागेल. त्यासाठीच आम्ही काम करत आहोत. तोपर्यंत विद्यार्थ्यांना आपण लाभ देऊ. पण जे लोक या आंदोलनाचा फायदा उठवत राजकीय पोळी भाजत होते, त्यांच्यापासून सावध राहायला हवे. उदयनराजे, संभाजीराजे यांनी आंदोलकांच्या प्रकृतीविषयी चौकशी केली पण बाकी लोक सरकारला बदनामा करण्याचा एककलमी कार्यक्रम राबवत होते.
हे ही वाचा:
बलात्कारी, मारेकरी मुलाविरुद्ध आईनेच साक्ष दिली; झाली जन्मठेपेची शिक्षा
‘वंदे भारत’ चीन सीमेपर्यंत धावणार
पवईत एअर होस्टेसची हत्या; फ्लॅटमध्ये मिळाला मृतदेह, एकाला अटक
६८व्या वर्षी प्रख्यात वकील हरीश साळवे तिसऱ्या विवाहबंधनात
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, लाठीचार्ज प्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. नवे अधिकारी तिथे आलेले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. पण ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत, ते मागे घेतले जातील.
या पत्रकार परिषदेआधी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. सरकारच्या वतीने दिलेला मसुदा त्यांनी जरांगे पाटील यांना दिला नंतर जरांगे पाटील यांनी त्यात काही बदल सुचविले. मग खोतकर आणि महादेव जानकर यांनी उद्या याबाबत जीआर काढला जाईल असे सांगितले.