दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने २ जून रोजी आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र असे असतानाही रविवारी १२ मे रोजी केजरीवाल यांनी दिल्लीतील मतदारांना मत देण्याचे आवाहन करताना, ‘तुम्ही ‘आप’ला मतदान केल्यास मला पुन्हा तुरुंगात जावे लागणार नाही,’ असे प्रतिपादन केले आहे. दिल्लीत झालेल्या रोड शोमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले. दिल्ली केंद्रशासित प्रदेशात लोकसभेच्या सात जागा असून येथे सहाव्या टप्प्यात म्हणजे २५ मे रोजी मतदान होणार आहे.
मोती नगरमध्ये रोड शो करताना ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल म्हणाले, ‘ते म्हणत आहेत की २० दिवसांनी मला पुन्हा तुरुंगात जावे लागेल. पण जर तुम्ही सर्वांनी ‘झाडू’ (आप चे चिन्ह झाडू) बटण दाबले तर मला पुन्हा तुरुंगात जावे लागणार नाही. तुमच्यात शक्ती आहे.’
आम आदमी पक्षानेही पक्षाच्या अधिकृत एक्स हँडलवरून त्यांचे हे आवाहन शेअर केले. १० मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना २०२४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचार करण्यासाठी सशर्त अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, आप नेत्याला सुमारे तीन आठवड्यांसाठी तात्पुरता दिलासा मिळाला.
अंतरिम जामीन आदेशात स्पष्टपणे त्यांना २ जून रोजी आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले होते. विशेष म्हणजे, त्यांना तिहार तुरुंगात परतण्याचे निर्देश दिल्यानंतर दोन दिवसांनी ४ जून रोजी सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे विरोधी गट जिंकून केजरीवाल यांच्यावरील खटला मागे घेण्याची अशक्यता शक्य असतानाही त्यांना २ जून रोजी शरण जावे लागणार आहे.
हे ही वाचा:
‘पेज थ्री संस्कृतीवर महाराष्ट्र चालवता येत नाही’
प्रशासनाच्या आदेशानंतरही गुजरातमधील जामनगरच्या रणजितसागर धरणावरील बेकायदा दर्गा ‘जैसे थे’
शादाब, शोएबकडून अल्पवयीन दलित मुलीचा विनयभंग!
‘पगडी घालून पंतप्रधान मोदी पोहचले गुरुद्वारात, स्वतः रोटी लाटून जेवणही वाढलं’
दिल्ली दारू धोरण घोटाळा प्रकरणातील शरणागती आणि त्यानंतरच्या कायदेशीर खटल्याचा दिल्लीतील राजकीय परिणामांशी संबंध जोडण्याचा स्पष्ट प्रयत्न करत असल्याच्या या प्रतिक्रियेबद्दल नेटिझन्सनी आप नेत्याची निंदा केली आहे. आम आदमी पार्टी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांच्या नेत्यांनी दावा केला आहे की हे प्रकरण पक्ष आणि त्यांच्या नेत्यांविरुद्ध कटकारस्थान आहे. तर, केजरीवाल यांचे वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी ‘एक्स’वर दिली आहे.