30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरराजकारणजावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही!

जावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही!

Google News Follow

Related

जगातील सर्वात मोठी हिंदू संघटना असलेल्या संघ परिवाराबाबत गरळ ओकरणारे जावेद अख्तर पुन्हा बोललेत. पहिल्यांदा ते बोलले तो त्यांच्या मनातला विखार होता. आता ते बोलले त्यात विखाराला बुद्धिभेदाचा तडका देण्याचा प्रय़त्न त्यांनी केला आहे.

‘संघ, बजरंग दलाला पाठिंबा देणाऱ्यांची मानसिकता तालिबानांसारखीच’, हे त्यांचे आधीचे उद्गार. ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही मुक्ताफळे उधळली होती. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्यांची चांगलीत हजामत झाली. परंतु तरीही ताज्या लेखात आपल्या मतावर ठाम राहताना ‘हिंदू हा जगातील सर्वात सभ्य आणि सुसंस्कृत समाज आहे’, असे कौतुकोद्गार त्यांनी काढलेत. याला Balancing Act  म्हणता येईल. संतापलेल्याला शांत करायचे असेल तर स्तुतीसारखे औषध नाही. अख्तर यांच्या स्तुतीस्तवनामागे यापेक्षा वेगळा विचार नाही. हिंदू समाज चांगला; परंतु हिंदुत्वाचा विचार घेऊन चालणारा संघ परिवार मात्र तालिबानी मानसिकतेचा, असा अचाट तर्क अख्तर यांच्यासारखे लोक मांडतात तेव्हा आश्चर्य वाटते.

तालिबान, इस्लामिक स्टेट्स किंवा अल कायदासारख्या दहशतवादी संघटना जो शरीयाचा विचार शिरोधार्य मानतात. त्या विचारात दहशतवादाची, कट्टरतेची पाळेमुळे आहेत. ‘वसुधैव कुटुंबकम’, हा विचार मानणाऱ्या संघ परिवाराला त्यांच्या पक्तींत बसवण्याचे काम हे केवळ बुद्धीभ्रम करण्यासाठी केलेले षडयंत्रच आहे.

गीतकार, पटकथाकार आणि कवी म्हणून जावेद अख्तर किंवा त्यांच्यासारख्या अनेक मुस्लिम कलाकारांना वलयांकीत करण्याचे श्रेय हे जन्मजात सहिष्णू असलेल्या हिंदू समाजाचेच आहे. हिंदूंच्या मनात कडवटपणा निर्माण झाला तर धंदा बसू शकतो, याची जाणीव अख्तर यांना आहे. त्यासाठी तरी आपली सेक्युलर प्रतिमा जपणे त्यांना भाग आहे. हिंदू समाजाबाबत त्यांनी काढलेल्या कौतुकोद्गारामागे केवळ धंद्याचे हे गणित आहे.

हिंदू समाजाचा गेल्या हजारो वर्षांचा इतिहास अत्यंत गौरवशाली आणि स्फूर्तीदायक आहे. या इतिहासाचे सतत स्मरण करून देत संघ परिवार गेली ९६ वर्षे समाज जागरणाचे काम करीत आहे. याच जागरणातून हिंदुत्वाचा अभिमान मनी धरून हिंदू समाज नव्या उमेदीने उभा राहातो आहे. हिंदू म्हणून राजकीयदृष्ट्या सजग बनतो आहे. त्यामुळे मनातून हिंदूंचा अतोनात द्वेष करणाऱ्यांना सुद्धा अस्तित्व टिकवण्यासाठी हिंदू प्रेमाचे मुखवटे धारण करणे अनिवार्य झाले आहे.

निवडणुकांच्या काळात राहुल गांधी यांना मंदिरे, गोत्र आणि जानवे आठवते. सीताराम येचूरी कम्युनिझमचा उगम वेदात आहे, असे उद्गार काढतात. जावेद अख्तर यांचे हिंदू समाजाबाबतचे हे उमाळे त्याच धाटणीचे आहेत.

पुरोगामी भामट्यांचे एक वैशिष्टय असते. जेव्हा ते तुमचा मुद्दा खोडून काढू शकत नाहीत, तेव्हा ते बुद्धिभेद करतात. अफगाणिस्तानचा कब्जा घेतलेल्या तालिबानी राजवटीचा चेहरा या आधी लोकांनी पाहिलेला आहे. त्यांच्याबद्दल चांगले बोलता येण्यासारखी स्थिती नाही. त्यामुळे तुम्हीही त्यांच्यासारखे आहात, असे सांगून संघाला बदनाम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

स्वंयसेवक असलेला एक राजकीय नेता दुसऱ्यांना प्रचंड बहुमताने देशाच्या सर्वोच्च पदावर बसल्याची खदखद जावेद अख्तर यांच्यासारख्या अनेकांच्या मनात आहे. कधी ठरवून तर कधी अचानक हे लोक ही खदखद व्यक्त करीत असतात.

जावेद अख्तर यांच्यासारखे लोक स्वत:ला विचारवंत म्हणवतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी संघर्ष करीत असल्याचा आव आणतात. परंतु यांच्याविरोधाच्या फुटपट्ट्या दुटप्पी असतात. इस्लाममधील कालबाह्य आणि रानटी चालीरीतींबद्दल बोलण्याची वेळ येते, तेव्हा विरोध केल्याचा उपचार पार पाडण्यासाठी एखादा ट्वीट करून शांत बसायचे. मात्र हिंदुत्ववाद्यांबाबत बोलायचे असेल तेव्हा ही मंडळी पूर्ण ताकदीने असेल नसेल तेवढे विष समोरच्यावर ओकत असतात.

जावेद अख्तर यांच्या लेखावर ‘सामना’ने कटवट टीका केली होती. एकाच वेळी दोघांना अंगावर घेणे झेपणार नाही, हे लक्षात आल्यामुळे अख्तर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहे. ठाकरे यांची लोकप्रियता ममता बॅनर्जी आणि एम.के.स्टॅलिन यांच्या तुलनेत तीळभरही कमी नाही, असे जावेद म्हणालेत. शिवसेनेबाबत त्यांच्या मनात निर्माण झालेल्या प्रेमाला महाराष्ट्रातील ताजे राजकीय समीकरण जबाबदार आहे.

काँग्रेसने गेली अनेक दशकं भाजपाची भीती दाखवून मुस्लिमांची मते मिळवली. भाजपा मुस्लिमविरोधी असल्याची भावना मुस्लिमांच्या मनात बिंबवण्यात काँग्रेसला बऱ्याच प्रमाणात यशही आले. त्यामुळे अनेक मुस्लिमांना आज भाजपाविरोधी चेहरामोहरा असलेली शिवसेना जवळची वाटू लागली आहे. मुंब्रा आणि कुर्ल्यातील मुस्लीमांशी बोलाल तर ही बाब चटकन लक्षात येऊ शकते. कोणी तरी भाजपावर वरवंटा चालवतोय याचे त्यांना समाधान असते. जावेद अख्तर यांची मानसिकता वेगळी नाही. आजच्या लेखात त्यांनी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचे केलेले कौतुक याच भावनेतून आलेले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांची ममता बॅनर्जी यांच्यासोबत केलेली तुलना मात्र अगदी समर्पक आहे. मुख्यमंत्र्यांचे राजकारण हे ममता यांच्या राजकारणासारखे अहंकारी आणि द्वेषपूर्ण आहे.

‘हिंदू समाज हा जन्मजात नेमस्त आहे, तो कट्टरवादी होऊ शकत नाही’, हे जावेद अख्तर यांचे म्हणणे अपूर्ण सत्य आहे. हिंदू समाज हा अहिंसा मानतो. अहिंसा म्हणजे हिंसा करण्याची क्षमता असूनही हिंसा न करणारा. कैलासावर ध्यानस्त बसलेल्या शिवासोबत हिंदू समाजाची तुलना करता येईल. परंतु तो शिवतांडवही करू शकतो आणि महाविनाशही. अख्तर प्रभुतींना हिंदू समाजाचा हा चेहराही समजून घेण्याची गरज आहे. गौरी जेव्हा दुर्गा होते तेव्हा तिचा ताप सहन करण्याची, तिच्या समोर उभे ठाकण्याची क्षमता भल्याभल्यांना होत नाही.

हे ही वाचा:

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे टेलिकॉम कंपन्यांवरील संकट दूर होणार

ठाकरे सरकारने ओबीसींचा घात केला

बाप्पासोबत तीन लाखाच्या मुकुटाचेही केले विसर्जन आणि…

गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या ‘या’ निर्णयाने लव्ह जिहादला बसणार फटका

हिंदू समाजाने अपवादात्मक प्रसंगी का होईना हे रौद्र रूप दाखवलेले आहे. त्यामुळे हिंदू समाजाला वारंवार डिवचणे बंद करण्यातच जावेद अख्तर यांच्यासारख्या लोकांचे भले आहे.

सहिष्णुतेसाठी हिंदू समाजाला अख्तर यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. गेल्या हजारो वर्षांचा इतिहास हिंदूंच्या सहिष्णुतेचीही साक्ष देतोय. ज्या हिंदू समाजाच्या प्रेमामुळे अख्तर मोठे झाले, त्यांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न हा निव्वळ कृतघ्नपणा आहे, याची जाणीव त्यांनी ठेवलेली बरी.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा