बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी आपल्या ज्येष्ठ पुत्र तेज प्रताप यादव यांना ६ वर्षांसाठी पक्षातून निष्कासित केल्याची घोषणा केली आहे. त्यांनी ही माहिती स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वी ट्विटर) वरून दिली.
लालू यादव यांनी लिहिले, “वैयक्तिक जीवनातील नैतिक मूल्यांची पायमल्ली, सामाजिक न्यायासाठी सुरू असलेल्या आमच्या सामूहिक संघर्षाला कमजोर करते. तेज प्रताप यांचे वर्तन, लोकआचार आणि बेजबाबदार वागणूक आमच्या कुटुंबाच्या मूल्यांना आणि संस्कारांना शोभणारी नाही. त्यामुळे त्याला पक्ष आणि कुटुंबापासून दूर करत आहे. आता त्याची कोणतीही भूमिका पक्षात किंवा कुटुंबात राहणार नाही. त्याला पक्षातून सहा वर्षांसाठी निष्कासित करण्यात येते.”
ते पुढे म्हणाले, “तो आता आपल्या वैयक्तिक जीवनाबाबत स्वतः निर्णय घेण्यास सक्षम आहे. जो कोणी त्याच्याशी संबंध ठेवेल, त्याने आपल्या विवेकबुद्धीने निर्णय घ्यावा. मी सार्वजनिक जीवनात लोकलाजेचा सदा पुरस्कर्ता राहिलो आहे आणि माझ्या कुटुंबातील आज्ञाकारी सदस्यांनीही हाच आदर्श स्वीकारला आहे.”
हे ही वाचा:
भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्ष सदैव प्रेरणादायी
संशोधकांनी काय विकसित केलं बघा !
इंदौरमध्ये जीर्ण इमारतींवर बुलडोजर
वादाचे मूळ कारण काय?
शनिवारी तेज प्रताप यादव यांच्या सोशल मीडियावरून एक पोस्ट व्हायरल झाली होती. त्यात एक युवतीसोबतचा फोटो होता आणि दावा केला गेला की, ती युवती अनुष्का यादव असून, तेज प्रताप आणि ती गेल्या १२ वर्षांपासून प्रेमसंबंधात आहेत.
व्हायरल पोस्टमध्ये लिहिले होते:
“मी तेज प्रताप यादव आहे, आणि माझ्यासोबत दिसणाऱ्या या चित्रातील युवतीचे नाव अनुष्का यादव आहे. आम्ही गेल्या १२ वर्षांपासून एकमेकांना ओळखतो आणि प्रेम करतो. आम्ही १२ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत.” ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर काही तासांनी तेज प्रताप यांनी स्पष्ट केले की, “माझे सोशल मीडिया अकाउंट हॅक करण्यात आले आहे आणि माझ्या फोटोंची चुकीच्या प्रकारे एडिटिंग करून मला आणि माझ्या कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्या शुभचिंतकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.”
भाजपचे नेते निखिल आनंद यांनी तेज प्रताप यांच्यावर टीका करत एक पोस्टमध्ये लिहिले, “जर तुमचे २०१२ पासून अनुष्का यादवशी नाते होते, तर २०१८ मध्ये ऐश्वर्या रायशी विवाह करताना ते जाहीर का केले नाही? ऐश्वर्या आणि तिच्या कुटुंबाशी फसवणूक करून विवाह करणे हे चुकीचे होते. तुम्ही सार्वजनिक माफी मागावी.”
