अमेरिकेने भारत पाकिस्तान संघर्षात युद्धविरामाची भूमिका घेतल्याचा दावा करत विरोधकांनी गेले काही दिवस सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, पण आता परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.
विक्रम मिस्त्री यांनी सोमवारी संसदीय समितीला सांगितले की, भारत-पाकिस्तान युद्धविराम घडवून आणण्यात अमेरिकेची कोणतीही भूमिका नव्हती. लष्करी कारवाया थांबवण्याचा निर्णय दोन शेजारी देशांनी परस्पर सहमतीने घेतला. इंडिया टुडे टीव्हीला सूत्रांनी ही माहिती दिली.
विरोधक सदस्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम घडवून आणण्यात आपली भूमिका असल्याचे सातत्याने जाहीरपणे सांगितल्यावर प्रश्न उपस्थित केले होते.
“ट्रम्प यांनी किमान सात वेळा जाहीरपणे युद्धविराम घडवून आणल्याचा दावा केला. मग भारत गप्प का बसला?” असा प्रश्न एका सदस्याने विचारला. दुसऱ्याने थेट विचारले की भारताने ट्रम्प यांना वारंवार आपली बाजू मांडण्याची संधी का दिली, विशेषतः जेव्हा ते सातत्याने काश्मीरचा उल्लेख करत होते.
सूत्रांनी सांगितले की, परराष्ट्र सचिवांनी या दाव्यांचे खंडन केले आणि भारत-पाकिस्तान युद्धविराम हा पूर्णतः द्विपक्षीय निर्णय असल्याचे सांगितले. “अमेरिकेची युद्धविरामात कोणतीही भूमिका नव्हती,” असे मिस्त्री यांनी समितीला सांगितले.
“डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा करण्यापूर्वी आमची परवानगी घेतली नव्हती. त्यांना चर्चेचे केंद्र व्हायचे होते, म्हणून ते आले,” असे त्यांनी पुढे नमूद केले.
‘पाकिस्तानकडून अणु संकेत नव्हते’
त्याचबरोबर परराष्ट्र सचिवांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष पारंपरिक युद्धाच्या चौकटीतच होता आणि इस्लामाबादकडून कोणतेही अणु संकेत किंवा कृती आढळली नाही.
दोन्ही देशांच्या सैन्य संचालन महासंचालकांनी (DGMO) १० मे रोजी सर्व लष्करी कारवाया थांबवण्यावर एकमत साधले.
विरोधी सदस्यांनी पाकिस्तानने चिनी बनावटीच्या लष्करी उपकरणांचा वापर केल्याबद्दल चिंता व्यक्त केली असता, विक्रम मिस्त्री यांनी उत्तर दिले, “त्यांनी काय वापरले याला महत्त्व नाही, आपण त्यांच्या एअरबेसवर जोरदार प्रहार केला, हे महत्त्वाचे आहे.”
संघर्षात भारताचच्या किती विमानांचे नुकसान झाले, याबद्दल विचारले असता, परराष्ट्र सचिवांनी राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत उत्तर देण्यास नकार दिला.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या विधानाबाबत विचारण्यात आले असता, मिस्त्री यांनी सदस्यांना त्यांचे विधान चुकीच्या अर्थाने घेऊ नये, असे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या टप्प्यानंतर नवी दिल्लीने इस्लामाबादला सूचित केले होते की, केवळ पाकिस्तान आणि पाकिस्तान-अधिकृत काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करण्यात आला होता.
परराष्ट्र व्यवहारांवरील संसदीय स्थायी समितीची ही बैठक काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये तृणमूलचे अभिषेक बॅनर्जी, काँग्रेसचे राजीव शुक्ला व दीपेंद्र हुड्डा, एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी, तसेच भाजपचे अपराजिता सारंगी आणि अरुण गोविल हे उपस्थित होते.
ही बैठक पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि दोन्ही अण्वस्त्रसज्ज देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर झाली.
