शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि काही आमदारांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. शिवसेनेला बसलेल्या या धक्क्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेते पदावरून हकालपट्टी केली आहे. तर सर्व नगरसेवक, आमदार, खासदार आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शिवसेनेचे ३९ आमदार फुटल्यानंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडली. तर या आमदारांनी सांगितले की ते शिवसैनिक आहेत. त्यामुळे आता उर्वरित पदाधिकाऱ्यांकडून पक्षनिष्ठतेचं प्रतिज्ञापत्र घेत असल्याची माहिती आहे. या बंडखोर आमदारांमुळे राज्यातील सत्ता हातातून गेली असताना आता पक्षही जाऊ नये म्हणून शिवसेनेचा हा प्रयत्न असल्याची माहिती आहे.
शिवसेनेचे खासदार, आमदार, नगरसेवक, विभागप्रमुख, जिल्हाप्रमुख, पदाधिकारी आणि शिवसेनेच्या विविध संघटनांचे पदाधिकारी यांच्याकडून हे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
‘रेडिसन ब्लू’ हॉटेलचं बिल शिंदे आणि समर्थक आमदारांनी केलं चुकतं
धर्मवीर सुपरहिट झाला! किती कमावले?
दहा तासांनी राऊत यांची ईडी कार्यालयातून सुटका
उद्धवजी कृपा करा, मुंबईकरांच्या मेट्रो स्वप्नाशी खेळू नका….
मी शपथ घेतो की, शिवसेनेच्या घटनेवर पूर्ण निष्ठा आणि श्रद्धा आहे. बाळासाहेबांनी घालून दिलेल्या आदर्शांवर पूर्ण निष्ठा आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर विश्वास असून, त्यांना बिनशर्त पाठिंबा आहे. उद्धव ठाकरेंच्या प्रति असलेल्या निष्ठेची पुन:श्च पुष्टी करत आहे. शिवसेनेच्या घटनेतील उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी सदैव कार्यरत असेन, असे प्रतिज्ञापत्रात लिहिलेलं असणार आहे तर त्याखाली स्वतःची सही आणि पद लिहिलेलं असावं असे आदेश देण्यात आले आहेत.







