लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून आता एनडीएची ताकद वाढताना दिसत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवार, १९ मार्च रोजी तामिळनाडूमधील पट्टाली मक्कल काची (पीएमके) या पक्षाने भाजपासोबत युती केली आहे. शिवाय युतीच्या अटींनुसार, पीएमकेला भाजपाने तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या १० जागा दिल्या आहेत. पीएमकेने भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील होण्याचा आणि राज्यातील लोकसभा निवडणुका लढवण्याचा आपला इरादा जाहीर केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पीएमकेचे अध्यक्ष अंबुमणी रामदोस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “देशाच्या हितासाठी आणि पंतप्रधान मोदींच्या कारभारात सातत्य राखण्यासाठी आम्ही एनडीएसोबत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला विश्वास आहे की या निर्णयामुळे लोकांमध्ये बदल घडून येईल. तामिळनाडूमधील लोक जे सध्याच्या राजकीय परिस्थितीवर असमाधानी आहे ते आमची आतुरतेने वाट पाहत आहेत. आमची आघाडी केवळ तामिळनाडूमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये प्रचंड विजय मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे, ज्यामुळे पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा पदावर येण्याचा मार्ग मोकळा होईल,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
हे ही वाचा:
“आयपीएलच्या आगामी हंगामात रोहित शर्मासोबत खेळण्यास उत्सुक”
“इंडी आघाडीतील नेत्यांची सभा म्हणजे ‘फॅमिली’ गॅदरिंग”
रमझानच्या दिवशी दुकान उघडे ठेवले म्हणून बांगलादेशात हिंदू व्यक्तीला मारहाण
हरवलेल्या दोन भावांचे मृतदेह आढळले मनपा पाण्याच्या टाकीत!
मंगळवारी सकाळी थायलापुरममधील रामदोस यांच्या निवासस्थानी जागावाटपाच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याची माहिती आहे. तामिळनाडू भाजपाचे प्रमुख के अण्णामलाई म्हणाले की, “एनडीएसोबत जाण्याचा पीएमकेचा निर्णय हा ४०० हून अधिक खासदारांसह युतीचा मोठा विजय सुनिश्चित करेल. तामिळनाडू आता बदलला आहे. २०२४ मध्ये आमचा मोठा विजय होईल आणि २०२६ मध्ये राजकीय बदल होईल. पीएमकेने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सालेममधील जाहीर सभेत सहभागी होण्याचे मान्य केले असून निवडणुकीत १० मतदारसंघात निवडणूक लढवणार आहेत.”