लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अद्याप जागावाटपाचा तिढा सुटलेला नसून महाविकास आघाडीमध्येही जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. अशातच महाविकास आघाडीमध्येही मतभेद निर्माण झाल्याची चिन्ह आहेत. त्यातच मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात अमोल किर्तीकरांना उमेदवारी मिळाल्याने काँग्रेसचे संजय निरुपम संतापले आहेत. त्यांनी यापूर्वीही त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली होती. त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांनी स्वतःची शिवसेना संपवली, राष्ट्रवादी संपवली आणि आता ते आमची काँग्रेसही संपवत आहेत, अशी घाणाघाती टीका संजय निरुपम यांनी केली आहे. “ज्याप्रमाणे ते मुंबईत जोर देऊन सहा पैकी पाच जागा घेण्याचा हट्ट आणि महाराष्ट्रातील ४८ पैकी जास्तीत जास्त जागा घेण्याचा हट्ट करत आहेत. त्यांच्याकडे काही नाहीये. त्यांचे नेते पळाले, त्यांचे कार्यकर्ते पळाले. त्यांचे मतदार किती हेही माहीत नाही. तरीही जबरदस्ती करून ते आमच्याकडून जागा घेत आहेत. मी आज भाकित करून सांगतो की मुंबईमध्ये पाचच्या पाचही जागा शिवसेना गमावणार आहे,” असा दावा करत निरुपम यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.
“आव्हान देतो की, ते एकही जागा जिंकणार नाहीत. जेव्हा पाच जागा पडणार तेव्हा शिवसेना संपली आणि काँग्रेसही संपणार. कारण या पाच मतदारसंघातील कार्यकर्ता विखुरणार. वाटाघाटी बरोबरीची झालं पाहिजे. प्रस्ताव होता की तीन- तीन जागा घेण्यात याव्या. पण पाच जागा तुम्ही घेऊन एक आम्हाला देणार. तर, आम्ही कार्यकर्त्यांना काय सांगणार? ठाकरे गटाची सध्या काय ताकद आहे, हे कोणीही काही सांगू शकत नाही,” अशी टीका संजय निरुपम यांनी ठाकरे गटावर केली आहे.
हे ही वाचा:
तैवानला ७.२ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का; गेल्या २५ वर्षातील शक्तीशाली भूकंप
ख्रिश्चन धर्म स्वीकाराण्यासाठी आर्थिक आमिष
केजरीवाल ‘आत’ गेल्यावर आता संजयसिंग ‘बाहेर’
कुराण जाळणाऱ्या इराकच्या सलवान मोमिकचा मृत्यू?
काँग्रेस नेते संजय निरुपम हे मुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघातून इच्छुक होते. अमोल किर्तीकर यांच्या नावाची या जागेसाठी घोषणा झाली. त्यानंतर संजय निरुपम यांचा पत्ता कट झाला असून परिणामी संजय निरुपम यांनी नाराजी व्यक्त केली होती. ठाकरे गटाने काँग्रेसवर अन्याय केला आहे, असं संजय निरुपम म्हणाले होते. “ठाकरे गटाने आम्हाला दाबलं आणि आम्ही दबले गेलो. ठाकरे गटाचे स्वतःचं काही अस्तित्व नाही त्यांच्यासमोर आम्ही झुकले आहोत. स्वबळावर ठाकरे गट एकही उमेदवार निवडणून आणू शकत नाही आणि अशा कमी जनाधार असलेल्या पक्षासमोर काँग्रेसने झुकणं हे श्रद्धांजली लिहिण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे, असं दिसतंय,” अशा तिखट शब्दात संजय निरुपम यांनी ठाकरे गटाचा समाचार घेतला होता.