33 C
Mumbai
Tuesday, October 26, 2021
घरराजकारणप्रकरण गंभीर, पण राऊत खंबीर

प्रकरण गंभीर, पण राऊत खंबीर

Related

महाराष्ट्रात १०० कोटींचा मामला गाजतोय. परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर महाविकास आघाडीत खळबळ आहे. अनेकांची फे फे उडाली. अधेमधे फेसबुकवर दर्शन देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गायब आहेत. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि नाईट लाईफचे खंदे पुरस्कर्ते ताडोबातून परतल्यानंतर कोरोनामुळे क्वारंण्टाईन आहेत. जाणत्या पवारांनी ठाकरे सरकारची निसटती लंगोटी सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु जमले नाही. पत्रकारांच्या समोर विनाकारण शोभा झाली. परंतु शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची बातच और आहे. ते एकाकी खिंड लढवतायत. पवारांचा गंडा बांधल्यामुळे एकाच विषयावर रोज वेगवेगळी भूमिका घेण्याचे कसब त्यांना साधलंय. 

महाविकास आघाडीचे सरकार २५ वर्षे टिकेल असा दावा करणारे राऊत अवघ्या सोळा महिन्यातच ‘महाविकास आघाडीत राहणे ही आमची मजबुरी आहे’ असे म्हणू लागलेत. हवेची दिशा बदलते आहे, तशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाषाही बदलते आहे.

‘वाझे म्हणजे लादेन आहेत का?’ असा सवाल करत विधी मंडळाच्या अधिवेशनात गर्जणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देशभरातील मीडिया शोध घेत आहे. परंतु मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर यांच्या लेटर बॉम्बनंतर ते नॉट रिचेबल झाले आहेत. त्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे पोलिस दलातील बदल्यांच्या दुकानदारीचा ६.३ जीबीचा डेटा असल्याचा गौप्यस्फोट केल्यानंतर महाविकास आघाडीत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.

भाजपा नेत्यांकडे हा दारुगोळा पुरवणा-या अस्तनीतल्या निखा-यांवर संजय राऊत प्रचंड संतापले आहेत. राज्यातील ‘संघ धार्जिणे अधिकारी हटवण्याबाबत काँग्रेसच्या मागणीवर मुख्यमंत्री विचार करतील’, असे ते प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले. ‘फडणवीसांनी जाहीर केलेला अहवाल म्हणजे विझलेली लवंगी असून त्याला काडीची किंमत नाही, मुख्यमंत्र्यांनी बोलावं अस यात काय आहे’, असा सवाल राऊतांनी केला आहे.

म्हणजे राज्यात अधिकारी नियुक्त करताना आणि बदलताना आता प्रामाणिकपणा आणि कर्तृत्व हा निकष रदबादल ठरवून कोण कोणाला धार्जिणा आहे, यावर निर्णय होणार आहेत. आयपीएस रश्मी शुक्ला यांनी दिलेल्या अहवालावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री बसून का होते, यावर राऊत गप्प आहेत. मुद्द्यावर बोलणे त्यांना तूर्तास तरी परवडणारे नाही. सत्तेसोबत राहण्यासाठी अनेकदा सत्याचा कडेलोट करावा लागतो. राऊत ते ताकदीने करतायत. पण त्यांचे दुर्दैव पाहा, राऊत ज्याची कड घेतायत त्याचा एक तर कपाळमोक्ष होतोय किंवा तो यांचाच कपाळमोक्ष करताना दिसतोय. सचिन वाझेसाठी राऊतांनी किल्ला लढवला, खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्याची वकिली केली, परंतु सगळं वाया गेलं. सचिन वाझे गजाआड झाले, मनसुख हत्या प्रकरणातून ते बाहेर येण्याची शक्यता नाही. 

ज्या परमबीर यांच्या समर्थनासाठी राऊतांनी कित्येक अग्रलेख खरडले, त्यांच्यावरच बरसण्याची वेळ राऊतांवर आली आहे. परमबीर यांना भाजपाची फूस आहे असा आरोप राऊत करतायत.  असे अनेक लेटरबॉम्ब आपल्याकडे आहेत असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केलेले आहे. परमबीर एकटे नाहीत, संजय पांडे यांनीही त्यांच्या पाठोपाठ बंड केले आहे. अनेक जण रांगेत उभे आहेत. ‘अस्तनीच्या निखाऱ्यां’ची संख्या रोज वाढतेच आहे.

राहुल गांधीच्या आरत्या ओवाळून राऊत थकत नव्हते तेही १०० कोटींच्या थरथराटामुळे नाराज झाले आहेत. काँग्रेस याप्रकरणात नाहक बदनाम होत असल्याची भावना सोनिया मातोश्रींच्या मनात दाटून आल्यामुळे महाराष्ट्रात झालेल्या १०० कोटींच्या घपल्याप्रकरणी त्यांनी अहवाल मागवला आहे. यूपीए सरकार गेल्यापासून देशात बंद झालेली भ्रष्टाचाराची चर्चा महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. 

सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलेली स्तुती अगदीच वाया गेल्याचे चित्र आहे. ‘राहुल आता पप्पू राहिले नाहीत’, असे म्हणणारे राऊत हे एकमेव नेते आहेत, परंतु राहुलनी त्याचीही चाड ठेवली नाही.

काँग्रेसने आपले रंग दाखवायला सुरुवात केली असून मुंबई महापालिकेत ८०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करून काँग्रेसने शिवसेने विरुद्ध एल्गार जाहीर केला आहे. काँग्रेस बिथरली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसची विश्वासार्हता शरद पवारांसारखीच आहे. ते कधी कोलांटी मारतील याचा भरोसा नाही. 

हे ही वाचा:

शिवसेनेवर काँग्रेसने केला ८०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप

संजय राऊत सारखा पलटी मास्टर दुसरा नाही

घरकोंबडा मुख्यमंत्री असल्यामुळे विरोधी पक्षनेत्याकडे दाद मागितली जाते

अशा परिस्थितीत पूर्णपणे कात्रीत अडकेपर्यंत वेळ मारून नेणे गरजेचे आहे. त्यासाठी तर्कसंगत बोलणे टाळणे भाग आहे. रोज नव्या भूमिका मांडत राहणे, मुद्दे सोडून बोलत राहणे याच बळावर मुकाबला शक्य आहे. 

पत्रकार परिषदेत अशा भानगडी उघड करण्यापेक्षा फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या अहवालाबाबत चर्चा केली असती तर घरातल्या गोष्टी घरात राहिल्या असत्या, महाराष्ट्राची अब्रू राहिली असती असा सल्ला राऊतांना दिला आहे.

दिवस बदलले आहेत याचे भान किमान राऊतांनी ठेवायला हवे. बंगल्यावर बसून लोक भेटायला यायचे हा ‘मातोश्री’चा इतिहास आहे. शिवसेनेने आता वर्तमानात जगायला हवे. पण त्याची शक्यता कमीच, राऊत खंबीर आहेत, तोपर्यंत उद्धवजी गंभीर होण्याची शक्यता कमीच!

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,443अनुयायीअनुकरण करा
4,420सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा