31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरराजकारणउद्धव ठाकरे 'या' प्रश्नांची उत्तरं दसरा मेळाव्यात मिळतील का?

उद्धव ठाकरे ‘या’ प्रश्नांची उत्तरं दसरा मेळाव्यात मिळतील का?

Google News Follow

Related

बुधवार, ५ ऑक्टोबर रोजी दसरा आहे. दसरा आणि शिवसेनेचा मेळावा हे गेल्या अनेक वर्षांपासूनच समीकरण आहे. मात्र, शिवसेनेत उभी फूट पडली आणि त्यांच्यात होत असलेल्या वादात आणखी भर पडली ती दसरा मेळाव्याच्या रूपाने. दसरा मेळाव्यावरून राज्याच्या राजकारणात काही दिवसांपूर्वी वादळ आलं होत. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर कोणाचा मेळावा होणार यावरून हा वाद सुरू होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मेळावा घेणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा प्रश्न उपस्थित झाला होता. अखेर न्यायालयात यावर निकाला लागला आणि उद्धव ठाकरेंना छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर मेळावा घेण्याची परवानगी मिळाली. त्यामुळे उद्धव ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर मेळावा घेणार आहेत तर त्याच दिवशी एकनाथ शिंदे हे बीकेसी मैदानावर मेळावा घेणार आहेत. त्यामुळे आता दसऱ्याच्या दिवशी दोन मोठ्या सभा राज्यात होणार आहेत.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असताना म्हणजेच पूर्वी दसरा मेळावा म्हणजे विचारांचं सोनं लुटायला शिवसैनिक महाराष्ट्रातून, देशभरातून मुंबईत दाखल होत होते. पण, आता उद्धव ठाकरेंच्या दसऱ्या मेळाव्यात काय सोनं लुटायचं हा प्रश्न सामान्यांना पडला आहेच आणि हाच प्रश्न शिवसैनिकांना पडला असणार आहे? कारण काही दिवसांपूर्वी म्हणजेच २१ सप्टेंबर रोजी शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा मुंबईत पार पडला. हा मेळावा म्हणजे दसरा मेळाव्याची रंगीत तालीम होती असं सांगण्यात आलं. पण, या गटप्रमुखांच्या मेळाव्याला संबोधित करताना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी नेहमीच्याच त्यांच्या टोमणे शैलीत भाषण केलं. त्यात मुंबई तोडण्याची भाषा, आदिलशाही, निजामशाही, मर्द, कोथळे आणि तीच तीच उदाहरण देत त्यांनी भाषण केलं. त्यामुळे रंगीत तालीम जर अशी असेल तर दसरा मेळावा कसा असणार हा प्रश्न नक्कीच केला गेला.

दसरा मेळाव्यात पुन्हा खोके सरकार, गद्दार, पालापाचोळा हेच शब्द कानावर पडणार आहेत की मराठी माणसाच्या, मुंबईकरांच्या, महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात आज जे प्रश्न उपस्थित झाले आहेत त्याची उत्तरं खरंच मिळणार आहेत हे पहावं लागेल.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआयवर देशविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याचा आरोप करत केंद्रातील मोदी सरकारने पाच वर्षांची बंदी आणली. ही बंदी आणल्यानंतर मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत सर्वच स्तरांवरून करण्यात आलं पण हिंदुत्वाचा नारा देणारे, आमचं हिंदुत्वच खरं आहे, असं सांगणारे उद्धव ठाकरे मात्र यावर काहीही बोलले नाहीत. पुण्यात जेव्हा पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देऊन आंदोलन करण्यात आलं होतं तेव्हा सुद्धा त्याचा निषेध उद्धव ठाकरेंनी केला नाही. ना आता मोदी सरकारच्या निर्णयाचं समर्थन त्यांनी केलं. म्हणजे हे हिंदुत्व फक्त बोलण्यासाठीच आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यात यावर उद्धव ठाकरे आपलं मत मांडणार आहेत का? आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत का? असे प्रश्न आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी सरस्वती देवीचे फोटो शाळेत असू नयेत यावर वक्तव्य केले होते. शाळांमध्ये महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे फोटो लावा अशी मागणी केली. देवी सरस्वतीला कुणी पाहिले आहे का? पाहिले असेल तरी फक्त ३ टक्के लोकांना सरस्वती देवीने शिकवलं, असेल असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं. शाळेत सरस्वती देवीची पूजा का करायची? सरस्वतीने आम्हाला शिकवलं नाही. यावरसुद्धा उद्धव ठाकरेंनी सोयीस्करपणे चुपी ठेवली आहे. यावर ते वक्तव्य करणार का? की त्यांच्यासोबत सरकारमध्ये बसले म्हणून त्यावर काहीच बोलणार नाहीयेत, हा प्रश्न नक्कीच आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा उठाव केला तेव्हा दरम्यानच्या काळात सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी शिवबंधन बांधलं. सुषमा अंधारे यांनी याआधी २०१९ मध्ये शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. हे सर्वश्रुत आहे. सुषमा अंधारे या महत्त्वाच्या आहेत, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी त्यांनी शिवबंधन बांधल्यावर केलं होतं.  त्यावेळी बाळासाहेबांवर टीका करणारे आता महत्त्वाचे झाले का? असे प्रश्न सगळ्यांना पडले आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी बाळासाहेबांचा फोटो, नाव वापरू नये म्हणून उद्धव ठाकरेंनी गदारोळ केला होता. आपलं दैवत, मार्दर्शक आणि गुरू म्हणून हे आमदार बाळासाहेबांच नाव, फोटो वापरत असतात. ते उद्धव ठाकरेंना पटत नाही पण बाळासाहेबांवर टीका करणाऱ्यांचा हात पकडून पुढे जाणं पटतं का? असा प्रश्न आहे आणि त्याच उत्तर दसरा मेळाव्यात मिळणार आहे का?

शिवसेनेने स्वतःच बळ वाढवण्याच्या नावाखाली सातत्याने हिंदुत्वाचा विरोध करणाऱ्या संभाजी ब्रिगेडशी युती केली. शिवसेना भवनाच्या इमारतीवर पुढच्या भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आणि या पुतळ्याच्या वरच्या भागात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं मोठं छायाचित्र लावण्यात आलं. यावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला होता. बाळासाहेबांचं चित्र हटवण्याची मागणी ब्रिगेडनं केली होती. तर, २०१६ मध्ये मराठा मोर्चाबाबत ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्रावरून वाद झाला होता. त्यानंतर सामना कार्यालयावर आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची जबाबदारी पुढे संभाजी ब्रिगेडने घेतली होती. २०१२ साली संभाजी ब्रिगेडनं रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी फोडून कुत्र्याचा पुतळा दरीत फेकला होता. हा शिवाजी महाराजांचा कुत्रा नव्हता, असं म्हणणं संभाजी ब्रिगेडचं होतं. एकूणच राजकीय इतिहासात संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना अनेकदा आमने-सामने आले आहेत. मात्र, आता शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र वाटचाल करणार आहेत. तर संभाजी ब्रिगेडची विचारसरणी अचानक उद्धव ठाकरेंना पटू लागली आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

शिवसेनेला लागलेली गळती ही फक्त राजकीय नाहीये तर आता घरातली माणसं सुद्धा त्यांना सोडून जात आहेत, असं चित्र उभं राहिलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत सावलीसारखे राहिलेले चंपासिंग थापा यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला. चंपासिंग थापा हे बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांच्या अवतीभवती नेहमीच दिसत असायचे. बाळासाहेबांचे निधन झाले त्यावेळीही अंत्यविधीच्या दरम्यान ते हजर होते. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचे काम केल्यामुळे आपण त्यांच्यासोबत जात आहोत, असं थापा यांनी स्पष्ट केलं आहे. राजकीय वर्तुळातून लोक जातच आहेत पण थापा यांच्यासारखी निष्ठावान लोकही उद्धव ठाकरेंकडे पाठ फिरवत आहेत. थापा हे जेव्हा एकनाथ शिंदेंकडे गेले तेव्हा खासदार अरविंद सावंत यांनी थापा यांच्यावर अगदीच आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. इतकी वर्षे ज्या व्यक्तीने आपली सेवा केली त्याच्याबद्दल अशा भाषेत बोलणाऱ्यांना उद्धव ठाकरे काहीच का बोलले नाहीत? असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला गेला.

हे ही वाचा:

अफगाणिस्तानात शैक्षणिक संस्थेत स्फोट; ४६ मुलींसह ५३ ठार

पोलीस महासंचालकांच्या हत्येची पीएएफएफ दहशतवादी संघटनेने घेतली जबाबदारी

जम्मू काश्मीरमध्ये पोलीस महासंचालकांची गळा चिरून हत्या

मुंबई विमानतळावरून ९.८ कोटींचे कोकेन जप्त

उद्धव ठाकरेंचा आणि त्यांच्या भोवताली असणाऱ्या गटाचा नक्की न्यायव्यवस्थेवर, संविधानावर विश्वास आहे की नाही, असा प्रश्न सुद्धा आता उपस्थित होत आहे, कारण न्यायालयात निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागला की न्यायव्यवस्था कशी योग्य न्याय देते, सत्याची बाजू घेते हे सांगितलं जात. पण हेच जर निकाल त्यांच्या बाजूने लागला नाही की मात्र, न्यायव्यवस्थेवर टीका केली जाते. उद्धव ठाकरेंची ही दुटप्पी भूमिका अगदी स्पष्टपणे समोर आली आहे. पण कधीपर्यंत चालणारे ही भूमिका हा प्रश्न नक्कीच शिवसैनिकांना पडला असेल? दसरा मेळाव्यात आपल्याला न्यायालयाच्या भूमिकेमुळे कसे मैदान मिळाले यावर नक्कीच उद्धव ठाकरे भाष्य करतील अशी अपेक्षा आहेच पण यापूर्वी न्यायव्यवस्थेवर उठवलेल्या प्रश्नांचं काय?

उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाचा विसर पडला आहे या मुद्द्यावरून शिवसेनेत फूट पडलीच आहे पण अजून एक मुख्य कारण म्हणजे उद्धव ठाकरे भेट नाहीत किंवा वेळ देत नाहीत असं आमदारांचं म्हणणं होतं. आताही शिवसेनेला खिंडार पडल्यानंतर आदित्य ठाकरे घराबाहेर पडलेत पण उद्धव ठाकरे मात्र मातोश्री आणि शिवसेना भवन इथेच अजून पोहचलेले दिसत आहेत. महाराष्ट्र पिंजून काढणार असे म्हणाले होते, पण आता कधी महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार याकडे लोक आता लक्ष ठेऊन आहेत. शिवसैनिकांकडून प्रतिज्ञापत्रच फक्त लिहून घेणार आहेत? दसरा मेळाव्यात नव्या यात्रेचं आयोजन करणारेत का आणि केलं तरी स्वतः जाणार आहेत का? या प्रश्नाचं उत्तर नक्कीच शिवसैनिकांना हवं आहे.

त्यामुळे दसऱ्याला विचारांचं सोनं लुटायला येणाऱ्या शिवसैनिकांना, लोकांना उद्धव ठाकरेंकडून नक्कीच या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आणि ती उत्तरं मिळणार की नाही हे बुधवारी समजेलच.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा