30 C
Mumbai
Wednesday, June 22, 2022
घरराजकारणशिवसेनेने शस्त्र टाकली?

शिवसेनेने शस्त्र टाकली?

Related

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर नॉट रिचेबल झालेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेले अनिश्चिततेचे धुके आता हळुहळु विरत चालले आहे. महाराष्ट्र नेमका कोणत्या वाटेला जाणार याचे चित्र जवळजवळ स्पष्ट होत चालले आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी विधानसभा बरखास्तीच्या दिशेने… असा ट्वीट करून आणि आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्वीटर प्रोफाईवरून पर्यावरणमंत्री हा उल्लेख काढून, काय होणार याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

शिवसेनेचे युवा नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे १५ जून रोजी अयोध्येत गेले होते. त्यांच्या सोबत संजय राऊत यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही हे दाखवण्यासाठी हा सगळा उपद्व्याप करण्यात आला, परंतु अयोध्येतील राम बहुधा आदित्य ठाकरे यांना पावला नाही. आदित्य ठाकरे यांची अयोध्या भेट शिवसेनेला काही फळली नाही. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेने ओढलेला हिंदुत्वाचा मुखवटा तकलादू असल्याचे काल एक ट्वीट करून आदित्य ठाकरे यांच्या अयोद्धा भेटीवर पाणी ओतले.

हिंदुत्वाच्या मुद्यावरून पक्षात फूट पडली आहे. आम्ही शिवसेना नेतृत्वावर नाराज नाही, आमची नाराजी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात आहे, असे शिंदेसमर्थक सांगतायत खरे, पण त्यात काही राम नाही. अपक्ष उमेदवार देवेंद्र भुयार यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यद्धतीवर घणाघाती टीका करून आमदारांच्या मनात काय आहे, ते आधीच सांगून टाकले आहे.

हाती आलेली सत्ता उद्धव ठाकरे यांनी घरी बसून घालवली, संजय राऊत यांनी बोल बोल बोलून संपवली. शिंदे यांचा लवाजमा जेव्हा ते सुरत मध्ये होता तोपर्यंत त्यांच्यासोबत किती आमदार आहेत याचे केवळ तर्क सुरू होते. परंतु सुरतहून जेव्हा शिंदे आणि समर्थक आमदारांचा ताफा गुवाहाटीकडे रवाना झाला त्यानंतर एक व्हीडियो जारी करण्यात आला. हा व्हीडीयो बाहेर आल्यानतंर शिंदे यांनी केलेला ४० आमदारांच्या समर्थनाचा दावा म्हणजे कोऱ्या बाता नसल्याचे स्पष्ट झाले. शिंदे यांचे समर्थक संजय शिरसाठ, बच्चू कडू आदी आमदार मीडियासमोर येऊन बोलतायत. नेमकं काय घडलं ते सांगतायत, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार आता आचके देतेय ही बाब स्पष्ट झाली आहे.

नित्याच्या शिरस्त्यानुसार संजय राऊत आज सकाळी मीडियाशी बोलताना म्हणाले, फार फार तर काय होईल सत्ता जाईल… थोडक्यात शिवसेनेने शस्त्र टाकली आहेत. शिवसेनेला संघर्षाची सवय आहे, शिवसेना राखेतून पुन्हा भरारी घेईल, असे राऊत सांगतायत, पण त्यात उसने अवसान जास्त आहे. एकनाथ शिंदे गेल्यानंतर शिवसेनेत लढवय्या नेता उरला कोण? त्यांच्या सोबत दोन तृतीयांश आमदार आहेत. ही संख्या वाढू शकते असे संकेत आहेत. किंबहुना ही खातरजमा करूनच त्यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे.

गेल्या दोन दिवसातील घडामोडींपैकी काही बाबी मजेदार आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे आणि शंभूराजे, बच्चू कडू, सांदीपान भूमरे, अब्दुल सत्तार, हे राज्यातील मंत्री पोलिसांच्या बंदोबस्तात महाराष्ट्रातून गुजरातमध्ये दाखल झाले, तरीही राज्याच्या गुप्तचर विभागाला त्याचा थांगपत्ता नव्हता यावरून पवारांनी वळसेंना झापले. म्हणे गेले दोन महिने राज्याच्या गुप्तचर विभागाकडून सत्ताधाऱ्यांना एकनाथ शिंदे यांच्याबद्दल तसे इनपुट दिले जात होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष का करण्यात आले हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारीत्र्या इतकाच गुंतागुंतीचा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस या घटनाक्रमापासून सुरूवातीपासून अलिप्त आहे. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे असे सांगून पवारांनी हात झटकले आहेत. काँग्रेस नेते कमलनाथ आज पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला आले होते. पंरतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोना असल्याचे सांगण्यात आल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही.

कमलनाथ हे अनुभवी आहेत, मध्यप्रदेशात हातातोंडाशी आलेली सत्ता गमावण्याचा आणि त्यातून निर्माण झालेला विषाद पचवण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. उद्धवजी आणि त्यांची भेट झाली असती तर चांगले झाले असते. पण जसा राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांना कोरोना झाला तसाच तो उद्धव ठाकरे यांना झाला, त्याला करणार काय?

हे ही वाचा:

अनिल परब पुन्हा ईडी कार्यालयात

सायंकाळी ५ पर्यंत बैठकीला उपस्थित राहा! शिवसेनेचा आमदारांना इशारा

एकनाथ शिंदेचे ट्विट; शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू नव्हे भरत गोगावले

अफगाणिस्तानमध्ये भूकंपाच्या धक्क्यात २५५ लोकांचा मृत्यू

महाराष्ट्रात जे काही राजकीय नाट्य घडते आहे त्यामुळे केवळ शिवसेना आणि शिवसैनिक अस्वस्थ आहेत, असे चित्र दिसते आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते शांत आहेत. शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी तर उद्धव ठाकरे आणि आदीत्य ठाकरे यांचे हात मजबूत करण्यासाठी, त्यांना समर्थन देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली आहे. शिवसेनेचा हा तंटा आधी राजभवन आणि नंतर विधीमंडळात सुटू शकतो हे त्यांना कोणी सांगावे. शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे हे नक्की.

विधानसभा बरखास्तीच्या दिशेने आहे, असा संजय राऊत यांचा ट्वीट आहे. एकनाथ शिंदे परतण्याची आशा शिवसेनेने सोडली याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये विधानसभा बरखास्तीचा प्रस्ताव ठेवला तरी राज्यपाल तो मंजूर कसा करणार? कारण शिवसेनेने बहुमत गमावलेले आहे, आणि ते जर नसेल तर शिवसेनेला ते सभागृहातच सिद्ध करावे लागेल.

शिवसेना राखेतून पुन्हा उसळी घेईल, असे राऊत म्हणतायत, याचा अर्थ राख झालेली आहे हे त्यांना मान्य आहे. एकनाथ शिंदे यांनी आपलीच शिवसेना ही खरी शिवसेना आहे, असा दावा केला आहे. खरी शिवसेना कोणाची हा फैसला फार दूर नाही. शिंदे हे मास लीडर आहेत. ते नारायण राणे यांच्यानंतर शिवसेनेत उरलेला एकमेव जननेते आहेत. त्यामुळे शिंदे यांचे जाणे उद्धव यांना परवडणारे नाही. जसे पत्रकारांसमोर भाषण ठोकून कायद्याच्या कचाट्यातून सुटता येत नाही तसेच पत्रकार आणि कॅमेरासमोर बाईट देऊन पक्षाला राखेतून उभारी देता येत नाही. त्यासाठी मैदानात उतरणारे, वेळ प्रसंगी विरोधकांशी दोन हात करणारे खरेखुरे नेतृत्व लागते. एकनाथ शिंदे यांना गमावल्यानंतर तरी शिवसेनेचे नेतृत्व ही बाब लक्षात घेणार आहेत काय?

शिंदे समर्थक आमदार संध्याकाळी बैठक घेऊन पुढची रणनीती ठरवणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी नैतिक आधारावर राजीनामा द्यावा, या पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना, शिंदे यांनी कुठेही राजीनामा देऊ नका असे म्हटलेले नाही. हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, असे कोरडे उत्तर त्यांनी दिली. महाराष्ट्रात पाच नाही, पंचवीस वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील आणि दिल्लीतही शिवसेनेचा मुख्यमंत्री बसेल असा दावा करणारे, फार फार तर काय होईल? सत्ता जाईल ना ? अशी भाषा करतायत. नीयतीची खेळी पाहा, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ट्वीट केल्याबद्दल महिनाभर तुरुंगात असलेला निखील भामरे तुरुंगाबाहेर आलाय, आणि त्याला तुरुंगात डांबणारे सत्तेबाहेर जाताना दिसतायत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,936चाहतेआवड दर्शवा
1,920अनुयायीअनुकरण करा
10,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा