पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा वाद उफाळून आला आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी यांनी पक्षावर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, “माझ्यासाठी तृणमूलचा अध्याय संपला आहे.” तिवारी यांनी दावा केला की हावडा येथील शिवपूर मतदारसंघातून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली, कारण त्यांनी ५ कोटी रुपये देण्यास नकार दिला.
४० वर्षीय तिवारी हे बंगाल क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक धावा (१०,१९५ फर्स्ट क्लास धावा) करणारे फलंदाज असून ते ममता बॅनर्जी सरकारमध्ये क्रीडा राज्यमंत्रीही होते. अलीकडील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्ष नेतृत्वावर भ्रष्टाचाराचे आरोप केले.
एका मुलाखतीत तिवारी म्हणाले, “या पराभवाचे मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. जेव्हा संपूर्ण पक्ष भ्रष्टाचारात बुडालेला असेल आणि कोणत्याही क्षेत्रात विकास नसेल, तेव्हा असे होणे अपेक्षितच आहे.” त्यांनी आरोप केला की यावेळी किमान ७०-७२ उमेदवारांनी तिकीट मिळवण्यासाठी सुमारे ५ कोटी रुपये दिले. तिवारी यांनी सांगितले की त्यांनाही अशीच ऑफर देण्यात आली होती, पण त्यांनी ती नाकारली. ते म्हणाले, “माझ्याकडूनही पैसे मागण्यात आले, पण मी स्पष्ट नकार दिला. तुम्ही स्वतः पाहू शकता की ज्यांनी पैसे दिले, त्यापैकी किती जण जिंकले.”
तिवारी यांनी हेही उघड केले की सुरुवातीला त्यांचा राजकारणात येण्याचा विचार नव्हता. २०१९ मध्ये त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर मिळाली होती, पण त्यांनी ती नाकारली. मात्र २०२१ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांच्या विनंतीवरून त्यांनी शिवपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. तृणमूलमध्ये अंतर्गत लोकशाहीचा अभाव असल्याचाही त्यांनी आरोप केला. बैठकींमध्ये मंत्र्यांना आपले मत मांडण्याची पुरेशी संधी दिली जात नव्हती. “मी एखाद्या मुद्द्यावर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, तर मला मध्येच थांबवले जात असे,” असे ते म्हणाले.
हावडा परिसरातील जलनिस्सारण आणि सांडपाणी व्यवस्थेसारख्या मूलभूत समस्यांबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते, त्यांनी अनेकदा हे प्रश्न उपस्थित केले, मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. काही विकासकामे त्यांनी स्वतःच्या खर्चातून पूर्ण केल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्यावर झालेल्या खंडणीच्या आरोपांनाही तिवारी यांनी फेटाळून लावले. “माझ्याकडे आधीच पुरेशी संपत्ती आहे. मी आयपीएलमध्ये १० वर्षे आणि फर्स्ट क्लास क्रिकेट २० वर्षे खेळलो आहे, मला कुणाकडून पैसे घेण्याची गरज नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
जालंधर, अमृतसरमधील स्फोटांमागे भाजप; मुख्यमंत्री मान यांचा आरोप
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात अडकवण्याची धमकी देत ४०.९० लाख लुटले
संदेशखालीमध्ये तृणमूल कार्यकर्त्यांचा केंद्रीय दलांसह पोलिसांवर गोळीबार
भाजपच्या विजयानंतर तीस्ता कराराचा लांबलेला प्रश्न सुटणार?
क्रीडामंत्री अरूप विश्वास यांच्यावरही त्यांनी टीका करत, त्यांना काम करण्याची संधी दिली गेली नाही असा आरोप केला. अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांना मंचावरही बोलावले जात नव्हते, असे त्यांनी नमूद केले. राजकारणातून पुढे जात आता तिवारी क्रिकेट कोचिंगमध्ये करिअर करण्याचा विचार करत आहेत. त्यांनी बंगाल रणजी संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला असून BCCI लेव्हल-२ कोचिंग परीक्षा देखील उत्तीर्ण केली आहे.







