28 C
Mumbai
Tuesday, June 21, 2022
घरराजकारण'धर्मवीर'चे संकेत मुख्यमंत्र्यांना कळलेच नाहीत!

‘धर्मवीर’चे संकेत मुख्यमंत्र्यांना कळलेच नाहीत!

Related

देशभरात १० जून रोजी राज्यसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हापासून महाविकास आघाडीची मोठ्या प्रमाणात पडझड सुरू झाली. विधान परिषद निवडणुका आणि मुंबईतला पावसाळा एकत्रच आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मुसळधार सुरू झाली असून शिवसेनेवर एकनाथ शिंदे नावाची दरड कोसळली आहे.

मतांचा पुरेसा कोटा नसताना आणि विरोधी बाकांवर बसले असताना भाजपाने राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडीक यांना विजयी केले. माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाविकास आघाडीला दणका देण्यात यशस्वी झाले. महाविकास आघाडीतील बेबनाव ठसठशीतपणे समोर आला. ठाकरे सरकारचे चाणक्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीतील अपयशाचे खापर अपक्ष आमदारांवरच फोडलं. त्यांनी तीन गद्दार आमदारांची नावे जाहीर केली. राऊत यांच्या या कारवायांमुळे अपक्ष खवळले. आमदार देवेंद्र भुयार यांनी अविश्वास दाखवत असाल तर पुढील निवडणुकांमध्ये वेगळा विचार करावा लागेल, असा दमच दिला. एकीकडे आपण आघाडीलाच मतदान केल्याच्या आणाभाका घेताना भुयार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रारीचा पाढा वाचत होते. मुख्यमंत्री भेटत नाही, पत्रांना उत्तर देत नाही अशी उघड तक्रार भुयार माध्यमांसमोर करत होते. भुयार बोलत होते, बाकीचे गप्प होते एवढाच फरक.

विधानसभा निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा दगाफटका होईल अशी कुणकुण सत्ताधारी नेत्यांना होती. भाजपाकडे चार उमेदवार मैदानात उतरवण्या इतपत संख्याबळ होते. तरीही भाजपाने प्रसाद लाड यांना पाचवा उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणामध्ये उतरवले. राज्यसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीकडून निष्काळजीपणा झाला, आता विधान परिषद निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होणार नाही, असे विधान ठाकरे सरकारचे एक मंत्री उदय सामंत यांनी केले. पण हे उसने अवसान होते. जिंकण्यासाठी भाजपा २० मतं कुठून आणणार? चोऱ्या माऱ्या करुनच ना? असा सवाल करून संजय राऊत यांनी आघाडीतील चलबिचल स्पष्ट केली होती. शिवसेनेचे आमदार काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतदान करण्यास राजी नाहीत, काँग्रेस नेते पहिल्या पसंतीच्या मतांसाठी शिवसेनेच्या आमदारांना फोन जात होते, या बातम्या आघाडीची अस्वस्थता स्पष्ट करीत होत्या.

राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला दणका बसला होता. विधान परीषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या चंद्रकांत हांडोरे आणि भाई जगताप यांच्यापैकी एक उमेदवार गॅसवर होता. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते काँग्रेसचे काय होतेय याचा विचार करण्याचे सोडून आपले २-२ उमेदवार विजयी कसे होतील याकडे लक्ष पुरवित होते. काँग्रेसमध्ये यामुळे प्रचंड खदखद वाढत होती. पण ईम्रान प्रतापगढीला विजयी करण्यासाठी काँग्रेसनेही हेच केले होते. काँग्रेसने पहिल्या पसंतीची मते हांडोरेंना देण्याचे आदेश देऊन सुद्धा हांडोरे पराभूत झाले, भाई जगताप विजयी झाले. काही तरी लफडं होणार आहे याची कुणकुण काँग्रेसला लागलीच होती. त्यातूनच अशोक चव्हाण यांनी अंथरूणाला खिळलेले असूनही मतदानासाठी आलेल्या मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर आक्षेप घेऊन वस्त्रहरण टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु निवडणूक आयोगाने य आक्षेपांना केराची टोपली दाखवल्यामुळे काँग्रेसची डाळ शिजली नाही.

राज्यसभेत शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची प्रतिक्रिया बोलकी होती, जो चमत्कार झालेला आहे तो मान्य केला पाहिजे, देवेंद्र फडणवीस यांनी विविध मार्गांनी माणसं आपलीशी करण्यात यश मिळवले आहे.

चमत्कार रोज होत नाहीत, असे म्हणतात पण देवेंद्र फडणवीस यांनी हा चमत्कार दुसऱ्यांदा घडवलाय. त्यांनी एकनाथ शिंदे यांनाही आपलंस केलंय का या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळेल. विधान परीषदेतील निकाल आणि एकनाथ शिंदे यांचे नॉट रिचेबल होणे याला एका बाजूला देवेंद्र फडणवीस जबाबदार असले तरी ते एकटेच नाहीत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा या घडामोडीत सिंहाचा वाटा आहे. अडीच वर्ष घरातून क्वचित बाहेर पडलेल्या उद्धव ठाकरे यांच्यावर राज्यातील जनता नाराज आहे, सत्ताधारी पक्षातील आमदार नाराज आहेत. ही नाराजी त्यांनी अनेकदा बोलून दाखवली तरी उद्धव ठाकरे यांनी त्यांची कार्यपद्धती बदलली नाही. संपर्कापेक्षा फेसबुक लाईव्हवर आणि संजय राऊतांवर विसंबून राहिल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे.

आता नॉट रिचेबल एकनाथ शिंदेच्या प्रकरणाकडे वळू. दिवंगत शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्यावर बायोपिकमध्ये संजय राऊत यांच्याबद्दल शिंदे यांच्या मनात नेमकी काय भावना आहे हे उघड झालं आहे. संजय राऊत यांनी शिवसेनाभवन येथे घेतलेल्या जगप्रसिद्ध पत्रकार परिषदेकडे शिंदे किंवा ठाण्यातील शिवसैनिक फिरकलेही नव्हते. सुरूवातीला शिंदे नाराज असून शिवसेनेतून फुटणार अशा बातम्या सतत यायच्या. या बातम्या बंद झाल्यानंतर सुद्धा शिंदे नाराज असल्याच्या बातम्या बंद झाल्या नाहीत. विधान परिषद निवडणुकीत मतदान केल्यानंतर शिंदे नॉट रिचेबल झाले. महाराष्ट्रातून उठून त्यांचे थेट गुजरात गाठणे बोलके आहे. गुजरातमध्ये त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली असून अन्य भाजपा नेते त्यांच्या संपर्कात आहेत. ते ज्या सुरतच्या ग्रॅंड हॉटेलमध्ये मुक्कामाला आहे, त्याची गुजरात पोलिसांनी घेराबंदी केली आहे.

शिंदे यांच्याकडे महत्वाची खाती असली तरी त्यांच्या खात्यात मातोश्रीचा प्रचंड हस्तक्षेप होता. त्यांचा रबर स्टॅंपसारखा वापर होत होता. त्यात शिंदे हे आनंद दिघे यांच्या तालमीत घडलेले शिवसैनिक असल्यामुळे सरकार टिकवण्याच्या नादात शिवसेनेचे पातळ होत असलेले हिंदुत्व त्यांना खटकत असण्याची दाट शक्यता दाट आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री केवळ नावाला बसवलेला होता, सत्ता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस राबवत होती. या पार्श्वभूमीवर शिंदे यांचे नॉट रिचेबल होणे तपासले पाहिजे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे आणखी काही आमदार नॉट रिचेबल आहेत. हा आकडा सुरूवातीला १३ सांगण्यात येत होता. हळूहळू तो फुगत चालला.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींनी म्हैसूर पॅलेस मैदानावर केला योग

गटनेतेपदावरून हटवल्यावर एकनाथ शिंदेंनी ट्विटरवरून ‘शिवसेने’ला हटवले

‘परिस्थितीला सामोरे जाण्याची शिवसेनेत धमक नाही’

“माफिया सरकारचे दिवस भरले”

 

शिंदे यांचे नॉट रिचेबल होण्याचा जेव्हा बभ्रा झाला तेव्हा आघाडीत खळबळ माजली. शिवसेनेचे चाणक्य संजय राऊत यांनी शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती दिली आहे. शिंदे ज्या दिवशी गायब झाले त्याआधी म्हणजे शिवसेनेच्या वर्धापन दिनी उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा आणि केशव प्रसाद मौर्य हे दोन नेते मुंबईत होते. भाजपामध्ये या दोन नेत्यांचे वजन फारसे नाही. परंतु त्यांच्या मुंबईत येण्याचे टायमिंग मात्र बोलके आहे. शिंदे यांच्या नॉट रिचेबल होण्याशी याचा कितपत संबंध आहेत याचा शोध घेण्याची गरज नाही.

ठाकरे सरकार पाच नाही २५ वर्षे पूर्ण करेल असे संजय राऊत यांनी पुन्हा पुन्हा सांगितले आहे. शिवसेना दिल्लीच्या दिशेने झेप घेण्यासाठी सज्ज आहे असेही ते म्हणालेत. तुर्तास त्यांच्या पक्षावर शिंदे नावाची दरड कोसळली आहे. त्यांनी आता शिवसेना नेतृत्वाच्या समोर अटीशर्थींचा प्रस्ताव ठेवलेला आहे. त्यांना पटवण्यासाठी आता शिवसेना नेतृत्वाच्या खटपटी लटपटी सुरू झाल्या आहेत. शिंदे यांना पुन्हा शिवसेनेच्या गोटात आणण्यासाठी शुभेच्छा.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

म्हणून लॉग इन Mahesh Vichare. बाहेर पडणे?

कृपया आपली टिप्पणी द्या!

आम्हाला follow करा

49,939चाहतेआवड दर्शवा
1,920अनुयायीअनुकरण करा
10,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा