बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मध्ये आसनवाटपाचा निर्णय झाल्यानंतर काही घटक पक्षांनी आपली असमाधानता व्यक्त केली होती. मात्र हिंदुस्तानी आवाम मोर्चा (हम) चे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांनी स्पष्ट केले आहे की त्यांनी जरी १५ जागांची मागणी केली होती, तरी सहा जागा मिळाल्यानेही ते पूर्णपणे समाधानी आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच आहेत.
केंद्रीय मंत्री मांझी यांनी सोमवारी सांगितले, “लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला दोन लोकसभा आणि एक राज्यसभा जागा देण्याचे आश्वासन दिले गेले होते, पण आम्हाला एकच जागा मिळाली. तरीही आम्ही एनडीएसोबतच राहिलो. आता आमच्या पक्षाला नोंदणीकृत (पंजीकृत) दर्जा मिळवण्यासाठी किमान आठ जागांची गरज होती, म्हणून आम्ही १५ जागांची मागणी केली होती. परंतु आम्हाला सहा जागा मिळाल्या — आणि आम्ही त्यावरही समाधानी आहोत. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आहोत.”
हेही वाचा..
झारखंड, मिजोरम आणि जम्मू-काश्मीरमध्ये पोटनिवडणुकांसाठी निवडणूक आयोगाची अधिसूचना
वित्त मंत्रालयाची सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसोबत बैठक
दिल्ली उच्च न्यायालयाने पीएफआयची याचिका ग्राह्य धरली
सुषमा अंधारे बरळल्या, म्हणतात आधी आरएसएस हेडक्वार्टर उद्ध्वस्त करा!
मांझी पुढे म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी आम्हाला खूप सन्मान दिला आहे. ते गयाजीच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. गयाजी, बिहार आणि देशाच्या प्रगतीसाठी आम्ही कोणतीही त्याग किंवा कुर्बानी देण्यास तयार आहोत.” आपल्या साधेपणावर भर देत त्यांनी सांगितले, “आम्ही भुईयां आणि मुसहर समाजातून आलो आहोत. अभावात जगणारे पण समाधानी लोक आहोत. जे मिळते, त्यातच समाधान मानतो.”
मांझी यांनी स्पष्ट केले की, “आमचा पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत ठामपणे उभा आहे आणि झालेल्या निर्णयांबाबत पूर्ण समाधान व्यक्त करतो.” उल्लेखनीय आहे की, बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएने रविवारी आसनवाटपाची घोषणा केली. या करारानुसार , मुख्यमंत्री नीतीश कुमारांचा जनता दल (युनायटेड) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) प्रत्येकी 101 जागांवर लढणार, केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला (रामविलास) २९ जागा, तर माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम मोर्चाला (हम) आणि राज्यसभा सदस्य उपेंद्र कुशवाहा यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चाला प्रत्येकी ६ जागा मिळाल्या आहेत. बिहार निवडणुकीचा पहिला टप्पा ६ नोव्हेंबरला आणि दुसरा टप्पा ११ नोव्हेंबरला पार पडेल. मतमोजणी १४ नोव्हेंबरला होईल.







