27 C
Mumbai
Monday, November 28, 2022
घरराजकारणउद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाद?

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाद?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वप्नामुळे उद्धव ठाकरेंचे काय होणार हा प्रश्न

Google News Follow

Related

आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, पंतप्रधान व्हावा असे वाटणे गैर नाही. प्रत्येक कार्यकर्त्याची ती भावना असते. पण सध्या महाराष्ट्रात आगामी काळात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल, याची चर्चा सुरू झाली आहे.

त्याचे निमित्त ठरले ते एकनाथ शिंदे गटातील आमदार आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी पुढल्या १०-१५ वर्षांत राष्ट्रवादी सत्तेत नसेल असे केलेले विधान. शंभूराज देसाई यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी जुनाच वाद आहे. शिवसेनेतून बाहेर पडलेले नसतानाही त्यांनी अनेकवेळा राष्ट्रवादीवर तोंडसुख घेतलेले आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांनी राज्यात असेच राजकारण सुरू राहिले तर लोकशाही टिकणार नाही, असे वक्तव्य केल्यानंतर त्याला शंभूराज यांनी हे प्रत्युत्तर दिले होते. पण त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्याबद्दल भाकिते वर्तविण्यास सुरुवात केली. त्यात आमदार निलेश लंके यांनी पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच होईल, असे विधान केले आहे.

अगदी दिवाळी पाडव्यानिमित्त अजित पवारांची भेट घेण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांनी अजित पवार हेच भावी मुख्यमंत्री असे बॅनरही झळकाविले होते. त्यामुळे या विषयाची आता चर्चा होऊ लागली आहे. पण अजित पवार हेच आगामी मुख्यमंत्री होणार असे म्हणत असताना महाविकास आघाडीचेच सरकारही महाराष्ट्रात येईल, असेही लंके म्हणतात. पण प्रश्न निर्माण होतो तो मविआचे सरकार येणार आणि मुख्यमंत्री अजित पवार होणार असे जर राष्ट्रवादीचे नेते ठामपणे म्हणत असतील तर त्यांना आपल्या नेत्यांबद्दल असा विश्वास व्यक्त करण्याची मुभा आहेच पण मग उद्धव ठाकरे यांचे काय, हा प्रश्न निर्माण होतो.

जर अजित पवार हेच मुख्यमंत्री होणार असतील तर उद्धव ठाकरे यांचा महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रीपदावरून पत्ता कापण्यात आला आहे का? महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे हेच २५ वर्षे मुख्यमंत्री राहतील असा दावा करण्यात येत होता, तेच तेव्हाचे बेस्ट मुख्यमंत्रीही होते. मग आता नेमके कुठे बिनसले आहे. उद्धव ठाकरे हे आपल्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री नसतील अशी ठाम खात्री आता राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटू लागली आहे की काय? आपल्या नेत्यानेच मुख्यमंत्री व्हावे असे वाटण्यास काहीही हरकत नाही. किंबहुना, प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या पक्षाचा नेताच मुख्यमंत्री व्हावा अशी आशा बाळगून असतो. मात्र ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनीच उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवून त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे सोपविली होती. तेव्हाही अजित पवार यांचा विचार मुख्यमंत्री म्हणून करता आला असता पण तसे झाले नाही. अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले मग आता शरद पवारांनाही आपल्याच पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटू लागले आहे का?

कारण राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री कधीही झालेला नाही. २०१९लाही उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करावे लागले. त्यामुळे आगामी मुख्यमंत्री म्हणून आता राष्ट्रवादीच्याच नेत्याला मुख्यमंत्री करायचे असे संकेत मिळायला सुरुवात झाली असावी. अजित पवारांचा विचार केला जात असेल तर मग उद्धव ठाकरेच कशाला, सुप्रिया सुळेही या यादीत नाही. त्याही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत असे आधीही म्हटले गेलेले आहे.

हे ही वाचा:

शिवसेनेचे माजी आमदार विनायक निम्हण यांचं निधन

कोणाचा दिवा विझतोय?

आता केजरीवाल म्हणतात नोटेवर गांधीजींसोबत लक्ष्मी-गणेशाचे चित्र छापा

ऋषी सुनक यांच्या घरी आली लक्ष्मी; पत्नी अक्षता मूर्ती यांना मिळाला १२६ कोटींचा लाभांश

 

यावर भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी टोमणा मारला होता की, अजित पवारांची भावी मुख्यमंत्री अशी पोस्टर आता बारामतीत लागली आहेत. बारामतीने कायमचे भावी पंतप्रधान पाहिले आता बारामतीकर कायमचे भावी मुख्यमंत्री पाहणार आहेत.

हे सगळे होत असताना एकीकडे हा विचारही मनात येतो की, राष्ट्रवादीचाच आगामी मुख्यमंत्री होईल असे जेव्हा त्यांचे नेते म्हणतात, तेव्हा कदाचित मविआच्या अडीच वर्षांच्या कारभारानंतर पुढच्या अडीच वर्षात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता होती असे म्हणता येईल किंबहुना तशी स्वप्ने पाहिली जात असतील. पण दुर्दैवाने मविआचे सरकारच कोसळले आणि मुख्यमंत्रीपदाची राष्ट्रवादी काँग्रेसची संधी हिरावली गेली. तेव्हा येत्या काळात मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीच्याच नेत्याची वर्णी लावायची असा चंग राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते व नेत्यांनी बांधला असल्यास नवल नाही. त्यात आता शिवसेनेतून बाहेर पडलेले रामदास कदम यांनीही राष्ट्रवादीच्या अजित पवारांना मुख्यमंत्री बनण्याची इच्छा असल्याचे विधान केले आहे. शिवसेनेला संपवून आपण मुख्यमंत्री बनावे अशी अजित पवारांची इच्छा होती, असे कदम म्हणाले आहेत. तेव्हा सगळी चर्चा ही अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाकडे येऊन ठेपली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,952चाहतेआवड दर्शवा
1,975अनुयायीअनुकरण करा
52,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा