भाजपने तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांना आगामी लोकसभा निवडणुकीत कोइम्बतूर लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरवले आहे. ही जागा भाजपसाठी खास आहे. कर्नाटक कॅडरचे आयपीएस अधिकारी राहिलेले अण्णामलाई यांनी सन २०१९मध्ये भारतीय पोलिस सेवेचा राजीनामा देऊन सन २०२०मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांची एक वर्षानंतर तमिळनाडू भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली होती. तेव्हा त्यांचे वय अवघे ३७ वर्ष होते. कोणत्याही राज्यांतील भाजपने नियुक्त केलेल्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा त्यांचे वय सर्वांत कमी होते.
लोकसभेच्या ३९ जागा असणाऱ्या तमिळनाडू राज्यात अण्णामलाई कमाल करून दाखवतील, असा विश्वास भाजपला आहे. तमिळनाडूला आतापर्यंत भाजपला फारसे यश मिळालेले नाही.
कोईम्बतूर हा परंपरेनुसार डाव्यांचा गड राहिला आहे. ज्यांचे भाजपशी विशेष पण अवघड असे नाते राहिले आहे. द्रमुकने सन १९९६मध्ये कोइम्बतूरची जागा शेवटची जिंकली होती. आता द्रमुकने बुधवारी अण्णाद्रमुकचे माजी नेते आणि कोइम्बतूरचे महापौर गणपती राजकुमार यांची उमेदवारी येथून घोषित केली आहे.
तमिळनाडूमधून सुरुवातीच्या काळात ज्या मोजक्या जागांवर भाजपचे खासदार निवडून आले, त्यात कोइम्बतूरचा समावेश होता. सन १९९८मध्ये येथून भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या हत्येचाही प्रयत्न झाला होता. १४ फेब्रुवारी, १९९८मध्ये कोइम्बतूरमध्ये ११ ठिकाणी बॉम्बस्फोटमालिका घडवण्यात आली होती. त्यात ५८ जण मारले गेले होते. या शहरात निवडणुकीचा प्रचार करणाऱ्या अडवाणी यांना लक्ष्य करण्यासाठी हे स्फोट घडवून आणण्यात आले होते. त्यानंतर सन १९९८ आणि १९९९मध्ये भाजपने कोइम्बतूरमधून विजय संपादित केला होता.
पंतप्रधान मोदी यांनीही नुकतेच कोइम्बतूरमधील दौऱ्यादरम्यान २६ वर्षांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटात मारल्या गेलेल्या ५८ नागरिकांना श्रद्धांजली वाहिली होती. भाजपने तमिळनाडूमधील हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोइम्बतूर येथील स्फोटांचा दाखला दिला आहे. दुसरे कारण म्हणजे येथे असणारी उत्तर भारतीय श्रमिकांची लक्षणीय संख्या. कोइम्बतूरमधील कापड उद्योगात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय श्रमिक काम करतात.
हे ही वाचा:
तृणमूल काँग्रेस ‘फ्युचर गेमिंग’चा सर्वात मोठा लाभार्थी; ५४० कोटींची देणगी
आपचे नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना ईडीकडून अटक
मोदींची तुलना औरंगजेबाशी हा तर देशद्रोह!
‘विकसित भारत’चे मेसेज शेअर करू नका!
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अण्णामलाई यांनी पदयात्रा काढली होती. ही पदयात्रा तमिळनाडूच्या सर्व २३४ विधानसभा क्षेत्रांमधून काढण्यात आली होती.