29 C
Mumbai
Wednesday, August 17, 2022
घरक्राईमनामातळघरातील फडताळात बरेच सांगाडे शिल्लक...

तळघरातील फडताळात बरेच सांगाडे शिल्लक…

Related

शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुपारी देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट केला. महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणारा हा दावा आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात केवळ सत्ता संघर्ष नव्हता तर अस्तित्वाची लढाई सुरू होती हे यातून पुरेसे स्पष्ट होते. एकनाथ शिंदे यांचा मोती नाकापेक्षा जड झाला होता का? पक्षप्रमुखांना त्यांच्या वाढत्या वर्चस्वाची भीती वाटत होती का? त्यातून शिंदे यांचे पंख कापण्याचे प्रयत्न सुरू होते काय? असे अनेक प्रश्न यातून निर्माण झालेले आहेत.

आमदार आदित्य ठाकरे काल शुक्रवारी सुहास कांदे यांच्या नांदगाव मतदार संघात होते. त्याच दरम्यान कांदे यांनी हा बॉम्ब टाकला. शिवसेनेतील सत्तासंघर्षाची सुरूवात एकनाथ शिंदे यांना मारण्यासाठी दिलेल्या सुपारी पासून झाली असा दावा त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना केला.

गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना शिंदे यांनी नक्षलवाद्यांविरोधात कठोर कारवाई केली. त्यातून त्यांच्या आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या जीविताला धोका निर्माण झाला. या संदर्भात गुप्तचर संस्थांनी दिलेल्या अहवालाच्या आधारावर जेव्हा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा प्रस्ताव ठेवला, तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देसाई यांना फोन करून अशा प्रकारच्या सुरक्षेची गरज नाही, असे स्पष्ट करून जादा सुरक्षेचा प्रस्ताव फेटाळला.

कांदे यांच्या या दाव्यामुळे गदारोळ माजणे स्वाभाविक होते. त्यांनी शंभूराज देसाई यांचे नाव घेतले होते. देसाई यांनी कांदे यांनी केलेला गौप्यस्फोट योग्य असल्याचे सांगून यासंदर्भातील घटनाक्रम माध्यमांच्या समोर ठेवला. शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याची चर्चा विधीमंडळात झाली त्यानंतर गृहराज्यमंत्री म्हणून देसाई यांनी गृहमंत्रालयाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. अशा प्रकारची बैठक बोलावण्यात आल्याचे उद्धव ठाकरे यांना समजताच त्यांनी वर्षा निवासस्थानावरून फोन करून शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची गरज नाही असे स्पष्ट सांगितले. देसाई यांनी त्यांना दोन वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी ठाकरे त्यांच्या मतावर ठाम होते.

परंतु तरीही मला हा विषय रेकॉर्डवर आणायचा असल्यामुळे मी बैठक घेतली, अधिकाऱ्यांशी चर्चा करून शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची गरज असल्याचा अहवाल मंजूरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला. परंतु मुख्यमंत्री पदावर पायउतार होईपर्यंत ठाकरे यांनी या प्रस्तावावर कोणतीही कारवाई केली नाही, असे देसाई यांनी सांगितले आहे. याचा अर्थ राज्यात झालेल्या सत्तांतराची समोर आलेली कारणे खूपच वरवरची असून प्रत्यक्षात खरा मामला अजून गुलदस्त्यातच आहे. त्यातला मूठभर मसाला काल बाहेर आलाय.

एकनाथ शिंदे हे आपल्या तालावर नाचणारे नेते नाहीत, ते आपल्या मुठीत राहू शकत नाहीत, वेळ आल्यास ते आपल्याला आव्हान देऊ शकतात याची कुणकुण उद्धव ठाकरे यांना होती. त्यामुळे नक्षलग्रस्त विभागात काम करणाऱ्या शिंदे यांच्या जीविताला असलेल्या धोक्याबाबत ते उदासिन होते.

हे ही वाचा:

ऑगस्ट महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद!

मविआ सरकारच्या काळात अघोषित आणीबाणी होती!

अग्निपथमध्ये नौदल प्रवेशासाठी महिलांची पसंती

दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही

शंभूराज देसाई आणि सुहास कांदे यांनी केलेल्या गौप्यस्फोटाचा अन्वयार्थ काढायचा झाल्यास नकोसे झालेल्या एकनाथ शिंदे यांचा काटा परस्पर निघाला तर बरा, असा हिशोब करून उद्धव ठाकरे यांनी त्यांना सुरक्षा नाकारली होती. त्यामुळेच कांदे यांनी आपल्या भाषणात सुपारी असा शब्द जाणीवपूर्वक वापरला होता. त्यामुळेच एकीकडे एकनाथ शिंदे नक्षलवाद्यांशी लढत असताना पक्षाच्या मुखपत्रातून शहरी नक्षलवाद्यांची तळी उचलण्याचे काम पक्षाचे प्रवक्त संजय राऊत करीत होते काय? नक्षलवादी स्टॅन स्वामी याच्या मृत्यूनंतर राऊत यांनी सामनातील रोखठोक या सदरातून मोदी सरकारवर कठोर टीका केली होती.

‘सरकारचा मेंदू कमकुवत झाला असला तरी चारित्र्य मात्र हुकूमशहाचेच आहे. सरकारविरोधात आवाज उठवणे म्हणजे देशद्रोह नाही’, असे सांगत राऊत यांनी स्टॅन स्वामीची तळी उचलली होती. ‘कवी वरवरा राव, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा हे सगळे लोक एका विशिष्ट विचारसरणीचे आहेत. साहित्य, कवितातून विद्रोह व्यक्त करतात. पण त्यातून राज्य उलथवले जाईल काय?’ असा सवाल, त्यांनी केला होता. ज्यांच्या देशविरोधी कारवायांच्या विरोधात देशाच्या गुप्तचर संस्था, सर्वोच्च न्यायालय कठोर शब्दात व्यक्त होत होते, त्यांची पालखी राऊत खांद्यावर नाचवत होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सुरात सूर मिसळला होता.

‘सामना’तून नक्षलवाद्यांना कुरवाळण्याचा होणारा प्रयत्न आणि कांदे यांनी केलेले आरोप यात काही सूत्र आहे काय, याचा शोध घेण्याची गरज आहे. ठाकरे सत्तेवर असताना सुरू असलेल्या अनेक विचित्र वाटणाऱ्या गोष्टींचा उलगडा ते सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर दिसतो आहे.

फोटोग्राफीच्या जगात मश्गुल असलेले उद्धव ठाकरे राजकारणाच्या क्षितीजावर धूमकेतूसारखे अवतरले. २००३ मध्ये पक्षाच्या कार्याध्यक्षपदी रूजू झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षात त्यांनी नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्यासारख्या वजनदार नेत्यांचा काटा ढिला केला आणि त्यांची पक्षातून गच्छंति केली. परंतु तेव्हा त्यांच्याकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नावाचे बम्हास्त्र होते. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत संसार थाटल्यानंतर डोईजड होणाऱ्या शिंदेंचा बंदोबस्त करायला, त्यांच्याकडे ती ताकद उरलेली नव्हती. त्यातूनच नक्षलवाद्यांकडून परस्पर काटा काढला गेला तर बरा, असा विचार ठाकरे यांनी केला होता, असेच सुहास कांदे आणि शंभूराज देसाई सूचित करतायत.

तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ‘एकनाथ शिंदे यांनी झेड प्लस सुरक्षा कधी मागितली नव्हती, त्यांना धमक्या आल्यानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती, असा खुलासा केला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सुरक्षा देऊ नका’, अशा कोणत्याही सूचना दिल्या नव्हत्या असा खुलासा केला आहे. परंतु सुरक्षा मागितल्यानंतर मिळते की गरजेनुसार? आणि मुख्यमंत्र्यांनी सुरक्षा देऊ नका, असे सांगितले नव्हते, मग गृहराज्य मंत्र्यांच्या अहवालावर कारवाई का झाली नाही? हे सुद्धा स्पष्ट करायला हवे.

नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांना संपवण्यासाठी सुपारी देण्यात आली होती, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. जेमतेम अडीच वर्षे टीकलेल्या ठाकरे सरकारचा कारभार खूनशी होता. गुन्हेगारी स्वरुपाचा होता. ठाण्यातील रहिवासी मनसुख हिरणची हत्या हा ठाकरे सरकारच्या कारभाराचा उत्तम नमुना होता. देशाचे नंबर नव उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडून वसूली करण्याच कट याच सरकारच्या काळात रचण्यात आला. त्याचे कर्तेकरविते सध्या तुरुंगात आहेत, परंतु सुत्रधार कोण हा सवाल मात्र अनुत्तरीत आहे. एकनाथ शिंदे यांचा मनसुख हिरण करण्याचा डाव होता काय, असा प्रश्न ताज्या घटनाक्रमामुळे निर्माण झाला आहे.

आम्हाला बोलायला भाग पाडू नका, बोलायचे झाल्यास आमच्याकडे बरेच विषय आहेत, असा गर्भित इशारा शंभूराजे यांनी दिलेला आहे. अर्थ स्पष्ट आहे. तळघरातील फडताळात अजून बरेच सांगाडे शिल्लक आहेत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,914चाहतेआवड दर्शवा
1,919अनुयायीअनुकरण करा
23,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा