बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ही जितकी प्रतिभावान अभिनेत्री आहे, तितकीच ती एक चांगली बॅडमिंटनपटूही राहिली आहे. ती राष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन खेळलेली आहे. आता आपल्या वडिलांच्या प्रेरणेने दीपिकाने संपूर्ण देशभरात ‘पादुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटन’ची ७५ केंद्रे सुरू करण्याचा संकल्प केला आहे.
दीपिकाने इंस्टाग्रामवर वडील प्रकाश पादुकोण यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिले, “माझं बालपण बॅडमिंटन खेळण्यात गेलंय आणि या खेळाने माझ्या आयुष्याला दिशा दिली आहे. म्हणूनच मी इतर लोकांनाही यामध्ये सहभागी करायचं ठरवलंय.”
‘पादुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटन’ (PSB) ही संस्था दीपिका पादुकोण यांनी सुरू केली असून जगप्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. पहिल्याच वर्षी ही संस्था भारतातील १८ शहरांमध्ये ७५ पेक्षा जास्त कोचिंग सेंटर्स सुरू करणार आहे.
या शहरांमध्ये बेंगळुरू, दिल्ली-एनसीआर, मुंबई, चेन्नई, जयपूर, पुणे, नाशिक, मैसूर, पानिपत, देहरादून, उदयपूर, कोयंबतूर, सांगली आणि सुरत यांचा समावेश आहे.
प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे की, “बॅडमिंटन फॉर ऑल” या ध्येयाने प्रेरित होऊन पीएसबीचे लक्ष्य या वर्षाच्या अखेरीस १०० सेंटर्स आणि पुढील ३ वर्षांत २५० सेंटर्स सुरू करणे आहे.
या कोचिंग केंद्रांमधून निवडले गेलेले उत्कृष्ट खेळाडू बेंगळुरूमधील तीन हाय-परफॉर्मन्स सेंटर्समध्ये अॅडव्हान्स ट्रेनिंगसाठी पाठवले जातात.
या उपक्रमाचा उद्देश असा आहे की प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना दर्जेदार आणि परवडणारी बॅडमिंटन कोचिंग मिळावी. यामुळे खेळाची गोडी लागेल आणि नवोदित कोचेससाठीही एक स्थिर करिअरचा मार्ग उपलब्ध होईल.
आजवर १०० हून अधिक प्रशिक्षकांना विशेष प्रशिक्षण व प्रमाणपत्र कार्यक्रमाद्वारे तयार करण्यात आले आहे. या संस्थेकडे आधुनिक सुविधा असून संपूर्ण देशभर एकसंध आणि दर्जेदार प्रशिक्षण देण्यावर भर दिला जात आहे.
