इंग्लंडविरुद्धच्या आगामी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारताचा नव्याने नियुक्त झालेला कसोटी कर्णधार शुभमन गिलने म्हटले आहे की ही मालिका अत्यंत रोमांचक ठरेल आणि भारतीय संघ कोणत्याही आव्हानासाठी सज्ज आहे. ही मालिका २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरु होणार आहे.
गिलने अशा वेळी भारतीय संघाचे नेतृत्व स्वीकारले आहे, जेव्हा रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन यांसारखे अनुभवी खेळाडू कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. आगामी दौऱ्यासाठी भारतीय संघ तुलनेने युवा असून, अनेक खेळाडू प्रथमच इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळणार आहेत.
बीसीसीआयच्या वेबसाईटवर प्रकाशित मुलाखतीत गिल म्हणाला, “भारतासाठी खेळणे हेच एक स्वप्न होते, पण आता कसोटी संघाचे नेतृत्व करणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. ही एक मोठी जबाबदारी आहे आणि मी या रोमांचक संधीची वाट पाहत आहे.”
कर्णधार म्हणून आपल्या भूमिकेबाबत गिलने स्पष्ट केले की तो फक्त मैदानावरील कामगिरीवर भर न देता, खेळाडूंना समजून घेऊन नेतृत्व करेल. “कर्णधाराने केवळ पुढे जाणे नाही, तर संघातील इतरांना संधी देणे आणि योग्य वेळी पाठिंबा देणे महत्त्वाचे असते,” असे गिल म्हणाला.
गिलने सांगितले की फलंदाजी करताना तो कर्णधार म्हणून नव्हे तर फलंदाज म्हणून निर्णय घेऊ इच्छितो. “जर मी त्या वेळी इतर गोष्टी विचारात घेतल्या, तर ते माझ्यावर अतिरिक्त दबाव आणते,” असे त्याचे म्हणणे आहे.
विराट कोहली व रोहित शर्मा यांच्यासोबत खेळण्याच्या अनुभवाबद्दल गिल म्हणाला, “विराट भाई आक्रमक आणि प्रेरणादायक नेतृत्व करतात, तर रोहित भाई शांतपणे संघाशी संवाद साधतात. या दोघांकडून मी वेगवेगळे पैलू शिकलो आहे.”
गिलने हेही नमूद केले की विराट, रोहित आणि अश्विन यांच्यासारख्या खेळाडूंनी परदेशात जाऊन कसोटी मालिका जिंकण्यासाठीची रूपरेषा उभी केली असून, तीच परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न युवा खेळाडू करतील.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका २० जूनपासून सुरू होऊन ४ ऑगस्टपर्यंत चालेल. हे सामने हेडिंग्ले, एजबस्टन, लॉर्ड्स, ओल्ड ट्रॅफर्ड आणि द ओव्हल या मैदानांवर खेळवले जातील. भारताचा उद्देश २००७ नंतर प्रथमच इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा आहे.
