30.5 C
Mumbai
Thursday, October 8, 2026
घरस्पोर्ट्सभारताच्या लेकींचा पाकिस्तानवर गोलवर्षाव!

भारताच्या लेकींचा पाकिस्तानवर गोलवर्षाव!

Google News Follow

Related

जूनियर महिला हॉकी आशिया कप २०२६ च्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या लेकींनी पाकिस्तानचा अक्षरशः धुव्वा उडवला. गतविजेत्या भारताने पाकिस्तानचा तब्बल १९-० असा एकतर्फी पराभव करत दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघाने आक्रमक खेळ करत पाकिस्तानवर दबाव निर्माण केला. अवघ्या ७व्या मिनिटाला पूजा साहूने गोल करत भारताचे खाते उघडले. त्यानंतर ९व्या मिनिटाला रोशनी ऐंडने गोल करत भारताची आघाडी दुप्पट केली.

यानंतर भारतीय खेळाडूंनी गोलचा धडाका सुरूच ठेवला. ११व्या मिनिटाला तनुश्री दिनेश काडू, तर १३व्या मिनिटाला सुखवीर कौर आणि सानिका चंद्रकांत माने यांनी गोल केले. मधु सिदार आणि गीता यादव यांनीही गोल करत भारताची आघाडी आणखी वाढवली. २३व्या मिनिटाला सानिका मानेने दुसरा गोल करत पाकिस्तानसमोरील आव्हान आणखी कठीण केले.

पहिल्या हाफमध्ये भारताने पूर्णपणे वर्चस्व गाजवले. तनुजा टोप्पो, पूजा मलिक आणि पूर्णिमा यादव यांनी गोल करत भारताला मध्यंतरापर्यंत तब्बल १०-० अशी आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या हाफमध्येही भारताचा आक्रमक खेळ कायम राहिला. ३९व्या मिनिटाला मधु सिदारने आपला दुसरा गोल केला. त्यानंतर ४०व्या मिनिटाला सुप्रियाने गोल केला. पूजा मलिकने तर पाकिस्तानच्या बचावफळीची अक्षरशः दमछाक केली. तिने ४९व्या आणि ५१व्या मिनिटाला सलग दोन गोल करत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली.

यानंतर कृष्णा शर्मा आणि बिनिमा धन यांनीही गोल करत भारताची आघाडी वाढवली. सुप्रियाने ५४व्या मिनिटाला दुसरा गोल केला. सामन्याच्या अखेरच्या मिनिटाला रोशनीने पुन्हा गोल करत आपला दुसरा गोल नोंदवला आणि भारताच्या १९-० अशा दणदणीत विजयावर शिक्कामोर्तब केले.

या स्पर्धेच्या गटसाखळीतही भारताने दमदार कामगिरी केली होती. जपान, मलेशिया आणि दक्षिण कोरिया यांसारख्या मजबूत संघांना पराभूत करत भारताने गटात अव्वल स्थान पटकावले होते.

आता उपांत्य फेरीत भारताचा सामना दक्षिण कोरिया आणि मलेशिया यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या विजेत्याशी होणार आहे. भारताला सलग तिसऱ्यांदा जूनियर महिला आशिया कप जिंकण्यासाठी आता केवळ दोन विजयांची गरज आहे. भारताने यापूर्वी २०२३ आणि २०२४ मध्ये ही स्पर्धा जिंकली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा