ऑस्ट्रेलियातील भारतीय वंशाचा युवा फलंदाज हरजस सिंग याने शनिवारी इतिहास रचला. ऑस्ट्रेलियातील वेस्टर्न सबर्ब्स संघाकडून खेळताना त्याने सिडनी क्रिकेट क्लबविरुद्ध पॅटन पार्कवर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अविश्वसनीय ३१४ धावा फक्त १४१ चेंडूंमध्ये झळकावल्या. या खेळीमुळे हरजस सिंग ग्रेड क्रिकेटच्या मर्यादित षटकांच्या स्वरूपात त्रिशतक ठोकणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
३५ षटकारांनी गाजवली ऐतिहासिक खेळी
हरजसच्या या दमदार खेळीमध्ये तब्बल ३५ षटकारांचा समावेश होता. त्याच्या या विक्रमी खेळीने संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले. या विक्रमामुळे तो न्यू साउथ वेल्स प्रीमियर फर्स्ट-ग्रेड क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणाऱ्या फार मोजक्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. या यादीत याआधी फक्त फिल जॅक्स (३२१ धावा) आणि व्हिक्टर ट्रम्पर (३३५ धावा) अशी दोनच नावे होती.
हरजस सिंगचा जन्म सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे झाला असला, तरी त्याचे आई-वडील मूळचे भारताच्या चंदीगढचे रहिवासी आहेत. सन २००० साली ते सिडनी येथे स्थलांतरित झाले होते. हरजसने यापूर्वीही चर्चेत आलेला परफॉर्मन्स दिला होता — २०२४ च्या अंडर-१९ विश्वचषक अंतिम सामन्यात, भारताविरुद्ध खेळताना त्याने ६४ चेंडूंमध्ये ५५ धावा केल्या होत्या, ज्या त्या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा होत्या.त्याच्या या योगदानामुळे ऑस्ट्रेलियाला तेव्हा २५३ धावांचा मजबूत डाव उभारता आला होता.
हे ही वाचा:
बंगालच्या दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, भूस्खलनात ६ जणांचा मृत्यू!
प्रख्यात अभिनेत्री आणि नृत्यांगना संध्या यांचे निधन
रशियाचा युक्रेनच्या प्रवासी ट्रेनवर हल्ला; ३० जखमी
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू म्हणतो, “भारत माझी मातृभूमी!”
हरजस सिंग काय म्हणाला?
विक्रम रचल्यावर ‘फॉक्स क्रिकेट’शी बोलताना हरजस म्हणाला, “आज मी ज्या प्रकारे चेंडू फटकावले, ते माझ्या कारकिर्दीतील सर्वात स्वच्छ स्ट्राइकिंग होते. मी ऑफ-सीझनमध्ये पॉवर-हिटिंगवर खूप मेहनत घेतली होती आणि आज ती मेहनत यशस्वी झाली, याचा मला अभिमान वाटतो.”
त्याने पुढे सांगितले, गेल्या दोन हंगामांपासून मी स्वतःच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी इतर गोष्टींमध्ये अडकत होतो.
आता मात्र मी फक्त माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करत आहे आणि त्याचे फळ मिळत आहे.”
करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची शक्यता
हरजसच्या या ऐतिहासिक त्रिशतकामुळे त्याचे करिअर पुढील स्तरावर झेप घेईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
त्याचे काही सहकारी — सॅम कॉन्स्टास, ह्यू वेइब्जेन, माहली बेअर्डमन आणि ऑलिव्हर पीक — हे आधीच राज्यस्तरीय संघांमध्ये दाखल झाले आहेत. त्यांपैकी सॅम कॉन्स्टास याने तर ऑस्ट्रेलियन संघातून कसोटी पदार्पणही केले आहे.







