विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि एक मोठा प्रश्न भारताच्या टेस्ट संघासमोर उभा राहिला – “नंबर ४ वर आता कोण?”
हा फक्त नंबर नसतो, हा असतो संघाचा कणा. आणि या कण्यावर गेल्या दशकभर भारतासाठी विराट कोहलीने झगडत, लढत, सामना वाचवत आणि जिंकवत काम केलं.
पण आता?
चेतेश्वर पुजारा सांगतात, “याचं उत्तर लगेच मिळणार नाही.“
त्यांनी ESPNcricinfo ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं, “या पायरीसाठी कोण योग्य आहे हे समजायला दोन-तीन सिरीज जातील. कारण नंबर ४ ही फार महत्वाची जागा असते. तुमचा सर्वात चांगला फलंदाज इथे असायला हवा.“
कोहलीच्या आधी आणि नंतर…
सचिन तेंडुलकरने निवृत्ती घेतल्यावर कोहलीने तब्बल ९९ टेस्टमध्ये नंबर ४ वर बॅटिंग केली. त्याच्यापाठोपाठ अजिंक्य रहाणेने फक्त ९ वेळा.
पण २०२४ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सिरीजमध्ये ही जागा रिकामी होती. के.एल. राहुल, श्रेयस अय्यर, रजत पाटीदार आणि देवदत्त पडिक्कल – सगळ्यांना संधी मिळाली, पण ‘कोहली’सारखा विश्वास कुणीच देऊ शकला नाही.
पुजारांचं प्रामाणिक मत
पुजारा म्हणतात, “ही प्रक्रिया आहे. अनेक नवखे खेळाडू सध्या संघात स्थिर होत आहेत. कोणालाच अजून पक्की जागा मिळालेली नाही. त्यामुळे थांबावं लागेल.“
शुभमन गिल – उत्तर की नवा प्रश्न?
शुभमन गिल यांचं नावही चर्चेत आहे. पण पुजारा म्हणतात, “गिल सध्या नंबर ३ वर आहे. तो नंबर ४ वर खेळेल का? त्याला ती भूमिका पटेल का? हे बघावं लागेल.“
गिलनं आजवर खेळलेल्या ३२ टेस्टमध्ये एकदाही टॉप ३ खेळाडूंखालून बॅटिंग केली नाही. तो ओपनिंग करतो, मग नंबर ३ वर आला, पण त्याचं सामर्थ्य आहे – नवीन चेंडूवर खेळणं.
पुजारा म्हणतात, “त्याचं नैसर्गिक स्थान म्हणजे टॉप 3. पण जर इंग्लंडमध्ये नंबर 4 वर खेळून त्याने चांगली कामगिरी केली, तर तो भारतासाठी नंबर 4 होऊ शकतो.“
पुढचा टप्पा – इंग्लंड दौरा
जूनमध्ये भारत ५ टेस्टसाठी इंग्लंडला जाणार आहे. हेच दौऱ्याचं महत्त्व – इथल्या खेळातच कदाचित पुढचा ‘कोहली’ दिसेल… किंवा अजून वेळ लागेल!
