भारताचे माजी कर्णधार आणि ज्येष्ठ क्रिकेट विश्लेषक सुनील गावसकर यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं २०२७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या वनडे विश्वचषकात खेळणं कठीण दिसतं आहे.
सध्या रोहित आणि विराट यांनी टी२० आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आता ते फक्त वनडे क्रिकेट खेळत आहेत. मात्र गावसकरांच्या मते, पुढील वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ नव्या चेहऱ्यांवर भर देईल.
गावसकर काय म्हणाले?
गावसकर म्हणाले, “हे पूर्णपणे निवड समितीच्या दृष्टीकोनावर अवलंबून आहे की रोहित आणि विराट संघासाठी पुढे किती योगदान देऊ शकतात. ते दोघे वनडे क्रिकेटचे उत्तम खेळाडू आहेत, पण निवडकर्ते २०२७ वर्ल्ड कपचं चित्र डोळ्यासमोर ठेवून संघ उभारतील. ते पाहतील की पुढील दोन-तीन वर्षांत हे दोघं खेळू शकतील का, आणि पूर्वीसारखं योगदान देऊ शकतील का.”
फॉर्म आणि फिटनेसवर प्रश्नचिन्ह
गावसकरांनी रोहितच्या फिटनेसबाबत चिंता व्यक्त केली. “रोहितला फिटनेसवर खूप काम करावं लागेल. आयपीएलमध्ये अनेक वेळा त्याला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून वापरलं जातं, हे त्याच्या फिटनेसबाबत काही सांगतं. दुसरीकडे, विराट फिट आहे आणि २०२५ आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत आहे. त्याने अकरा सामन्यांत ५०५ धावा केल्या आहेत,” असं गावसकरांनी सांगितलं.
पुढील दोन वर्ष महत्त्वाची
गावसकर पुढे म्हणाले, “प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर, आत्ताच्या फॉर्मनुसार मला वाटत नाही की हे दोघं २०२७ वर्ल्ड कप खेळतील. पण जर पुढील दोन वर्षांत त्यांनी सतत शतकं ठोकली, तर मग त्यांना संघाबाहेर ठेवणं देवालाही शक्य होणार नाही.”
रोहित-विराटचा वनडे वारसा
दोघांचाही वनडे क्रिकेटमधील इतिहास उज्वल आहे. रोहित हा तीन द्विशतक करणारा एकमेव फलंदाज आहे. तर विराटने वनडे क्रिकेटमध्ये तब्बल ५१ शतकं झळकावली आहेत. त्यामुळेच त्यांचं विश्वचषकात असणं की नसणं, हे निवडकर्त्यांसाठी मोठं आव्हान ठरणार आहे.
