आगामी ९ महिन्यांतील महिला क्रिकेट स्पर्धा हा खेळ नव्या उंचीवर नेतील, असा विश्वास आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी व्यक्त केला. महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ व महिला टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या तारखा व स्थळांची घोषणा सोमवारी करण्यात आली.
महिला वनडे वर्ल्ड कप ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर दरम्यान भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. भारतातील बेंगळुरू, गुवाहाटी, इंदूर, विशाखापट्टणम तर श्रीलंकेत कोलंबो येथे सामने रंगतील. भारत आपला पहिला सामना बेंगळुरूत खेळेल. नॉकआउट सामने गुवाहाटी, बेंगळुरू व कोलंबो येथे होणार असून, पाकिस्तान पात्र ठरल्यास कोलंबो तटस्थ मैदान असेल.
या स्पर्धेत भारतासह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश व पाकिस्तान सहभागी असतील.
महिला टी-२० वर्ल्ड कप १२ जून ते ५ जुलै २०२६ या कालावधीत इंग्लंडमध्ये होईल. बर्मिंगहॅम, मॅंचेस्टर, लीड्स, साउथॅंप्टन, ब्रिस्टल, ओव्हल व लॉर्ड्स येथे सामने खेळवले जातील. १२ संघांपैकी ८ निश्चित झाले असून उर्वरित ४ संघ पुढील वर्षीच्या क्वालिफायर स्पर्धेतून ठरतील.
जय शाह म्हणाले, “या टूर्नामेंट्समुळे महिला क्रिकेटच्या लोकप्रियतेत मोठी वाढ होईल. चाहतेही या स्पर्धांसाठी तयारीला लागतील. महिला क्रिकेट हीच आमची प्राथमिकता आहे.”
