भारताची युवा स्क्वॅशपटू अनाहत सिंह हिने शानदार खेळ करत जागतिक ज्युनियर वैयक्तिक स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व (क्वार्टर फायनल) फेरीत प्रवेश केला. स्पर्धेतील अव्वल मानांकित असलेल्या अनाहतने प्री-क्वार्टर फायनलमध्ये मलेशियाच्या डॉयस ये सॅन ली हिचा ११-४, ११-८, ११-३ अशा सरळ गेममध्ये पराभव केला.
गतवर्षी या स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या अनाहतने यंदाही विजयी घोडदौड कायम राखली आहे. आता उपांत्यपूर्व फेरीत तिच्यासमोर इजिप्तच्या हबीबा रिजक हिचे आव्हान असेल.
महिला गटातील अन्य लढतींमध्ये इजिप्तच्या हबीबा रिजकने अमेरिकेच्या शार्लोट जे हिचा चार गेममध्ये पराभव करत अंतिम आठमध्ये प्रवेश केला. तर बेल्जियमच्या सवाना मोक्सहॅम हिने पिछाडीवरून जोरदार पुनरागमन करत हाँगकाँगच्या अॅना क्वांग हिला ३-१ असे नमवले. इजिप्तच्या मलिका एलकाराक्सी हिने भारताच्या दिया यादव हिच्यावर विजय मिळवत पुढील फेरी गाठली.
पुरुष गटात अव्वल मानांकित मोहम्मद जकारिया याने पाकिस्तानच्या नौमान खानचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. फ्रान्सच्या अमीर खालिद-जौसेलिन याने इंग्लंडच्या रॉनी हिकलिंगला सरळ गेममध्ये हरवले, तर हाँगकाँगच्या हेलेन टँग हिने मलेशियाच्या हार्लीन टॅनवर मात केली.
मात्र, भारताला पुरुष गटात धक्का बसला. स्पर्धेतील ५/८ मानांकित आणि विद्यमान आशियाई अंडर-१९ विजेता आर्यवीर दिवाण याला अमेरिकेच्या यासीन शलाबीकडून ११-४, ११-१, ११-५ अशा सरळ गेममध्ये पराभव स्वीकारावा लागला.
दरम्यान, २० ते २५ जुलै दरम्यान वैयक्तिक स्पर्धा होत असून २६ ते ३१ जुलै या कालावधीत पुरुष व महिला सांघिक स्पर्धा रंगणार आहेत. गतवर्षी कैरो येथे भारतीय पुरुष संघाने कांस्यपदक जिंकून तब्बल १३ वर्षांचा पदकांचा दुष्काळ संपवला होता. यंदाही भारतीय संघाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







