बॅलेटवर निवडणुका होत नाहीत, म्हणून भाजपचा विजय होतो, हा काँग्रेसचा दावा पुन्हा एकदा पोकळ ठरलेला आहे. यापूर्वी सिलचर आणि त्रिपुरामध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. आता चार राज्यांतील २८ विधान परिषदेच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या वाट्याला फक्त एक जागा आली. म्हणजेच ‘लंगोटी वाचलेली आहे’. सत्ताधारी पक्ष असलेल्या कर्नाटकात चारही जागांवर काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव झाला. इथे प्रशासन त्यांचे होते, पोलीस त्यांचे होते, ईव्हीएमला दोष देण्याची सोयही नव्हती. आता नागपूरमध्ये मिळालेली एक जागा आणि वाराणसीत झालेला भाजपचा पराभव साजरा करून काँग्रेसचे नेते आपले तोंड लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘बेगाणी शादीत अब्दुल्ला दिवाना’ अशी त्यांची गत झाली आहे. काँग्रेस पक्षाचे देशविरोधी, हिंदूविरोधी राजकारण मतदारांना पटत नाही, त्यामुळे त्यांच्या पाठीशी मतदार उरलेलाच नाही. पक्षात माजलेली दुफळी अधिक रुंदावत चालली आहे. काँग्रेसच्या पराभवाची अशी बरीच कारणे आहेत, त्यात काही सुधारणा करण्याची इच्छा पक्षाच्या नेतृत्वाला दिसत नाही. उलट लोकांशी काडीमात्र संबंध नसलेले मुद्दे उपस्थित करून केंद्र सरकारच्या वाटचालीत खोडे घालण्याचे काम काँग्रेस नेते राहुल गांधी करत आहेत. निवडणुकांमध्ये त्याचे परिणाम पक्षाला भोगावे लागतात. “मोदी का बाप भी जायेगा,” असे म्हणणाऱ्या पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या राज्यात आणि त्यांच्या बालेकिल्ल्यात मतदारांनी काँग्रेसची बत्ती गुल केली आणि ‘कोण बाप आहे, कोण जाईल’ हे दाखवून दिले. बिनडोक विधाने करून फार फार तर होयबा कार्यकर्त्यांच्या टाळ्या मिळतील, लोकांची मते मिळत नाहीत. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांनी काँग्रेसला कर्नाटकाचे राजकीय भविष्य सांगून टाकले आहे.



