सध्या मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण पेटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गोरगरीबाला पकडायचे, मराठी बोल म्हणून सांगायचे, येत नसेल तर ठोकायचे, असे मराठी प्रेमाचे सोहळे ठिकठिकाणी सुरू आहेत. यात बॉलिवुडच्या सेलिब्रिटींसह काही सन्माननीय अपवाद आहेत. मराठी माणसांला ठगणाऱ्या, लुबाडणाऱ्या एकालाही हे मराठीचे दुकानदार कधी हात लावत नाहीत. वसई विरारचे माजी महापालिका आय़ुक्त अनिलकुमार पवार यांच्या भ्रष्टाचाराची सध्या ईडीचे अधिकारी चौकशी करतायत. नालासोपाऱ्यातील ४१ बेकायदा इमारती तोडल्यानंतर नगर रचना विभागाचा उपसंचालक वाय.एस. रेड्डी याच्यापासून ही कारवाई सुरू झाली. आणखी एक शाह नावाची व्यक्ती ईडीच्या रडारवर आली आहे. हा शहा गेली २५ वर्षे इथे सक्रीय आहे. अनधिकृत इमारती ठोकायच्या, मराठी माणसाला घरे विकायची, त्यांना ठगायचे, असे हजार गुन्हे करणारे हे लोक, परंतु त्यांना हात लावण्याची कुणाची टाप नसते. ते मराठी बोलतात की नाही बोलत याकडेही मराठीच्या नावाने दुकानदारी करणाऱ्यांचे लक्ष नसते.



