ब्राझीलमध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत लुईझ इनासियो लुला द सिल्व्हा चौथ्यांदा विजयी झाले. निवडणुकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कडवे समर्थक असलेल्या फ्लॅव्हीओ बोल्सोनारो यांचा त्यांनी पराभव केला. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर त्यावर ट्रम्प यांनी व्यक्त होण्याचे काहीच कारण नव्हते. ब्राझीलच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करण्याचा त्यांना अधिकार नव्हता. दुसऱ्याच्या फाटक्यात पाय घालण्याच्या खोडीमुळे त्यांनी ब्राझीलमध्ये वोटचोरी झाल्याचे तुणतुणे वाजवले. निवडणुकीत घपला झाल्याचा आरोप केला. वोटचोरी हे जगभरातील पराभूतांचे पालूपद बनले आहे. योगायोग म्हणजे लुला यांनी पराभूत केलेले फ्लॅव्हीओ हे देखील राहुल गांधी यांच्याप्रमाणे रडतराऊ युवराज आहेत. राहुल आणि त्यांच्यात बरीच साम्य स्थळे आहेत. एका सार्वभौम देशाने दुसऱ्या सार्वभौम देशाच्या कामकाजात, व्यवहारात, अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये, हा राजकीय शिष्टाचार आहे. दुर्दैवाने जगाच्या इतिहासात अशी उदाहरणे विरळा आहेत. जगात शिष्टाचारापेक्षा जंगलाचा कायदा जास्त चालतो. इथे कायदे आणि नियम फक्त शक्तिहीनांसाठी असतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प तर एखाद्या मोकाट वळूप्रमाणे जागतिक शिष्टाचार पायदळी तुडवत चालले आहेत. त्यांनी ताजी ढवळाढवळ ब्राझीलच्या अंतर्गत बाबींमध्ये केलेली आहे. त्यांना धार्जिण्या असलेल्या ब्राझीलच्या राजकीय नेत्याच्या आरोपांना साथ देण्याचे काम केले आहे. राष्ट्राध्यक्ष लुला यांना निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ट्रम्प यांच्या टोळभैरव राजकारणाच्या विरोधात जगभरातील जे प्रमुख नेते उभे राहिले, त्यात लुला यांचा समावेश आहे. ते डाव्या विचारसरणीचे जरी असले तरी घनघोर राष्ट्रवादी आहेत. विजयी झाल्यानंतर ट्रम्प यांच्या टीकेकडे साफ दुर्लक्ष करत ब्राझीलला जगातील कोणत्याही महाशक्तीचे बॅकयार्ड बनू देणार नाही, असे विधान त्यांनी केले आहे. या विधानाचा रोख ट्रम्प आणि अमेरिकेकडेच होता.



