काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘वोटचोरी’ नावाचे नवे शस्त्र परजलेले आहे. सर्वोच्च न्यायालयात याबाबत काल झालेल्या सुनावणीत बऱ्याच प्रमाणात त्यांचा प्रचार उताणा पडला आहे. राहुल गांधी यांनी गेल्या ११ वर्षांत असे काही मुद्दे सातत्याने उपस्थित करत आले आहेत. एखादा मुद्दा उत्पन्न करायचा, देशभरात वातावरण निर्मिती करायची. जनतेमध्ये उद्रेक निर्माण करण्याचा प्रय़त्न करायचा. नव्या मुद्द्याचे काय होणार याबाबत चर्चा करताना जुन्या मुद्द्यांचे काय झाले याचा यावेळी तरी विचार व्हायला हवा. काँग्रेस पक्ष गेली ११ वर्षे सत्तेपासून वंचित आहे. सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर सरकारचे वाभाडे काढण्याचा हक्क त्यांना लोकशाही व्यवस्थेनेच प्रदान केलेला आहे. परंतु राहुल गांधी जे मुद्दे उपस्थित करून सरकारच्या विरोधात राळ उडवण्याचा प्रयत्न करतात, ते तमाम मुद्दे तकलादू ठरले आहेत. राफेल खरेदीच्या मुद्द्यावरून त्यांनी चौकीदार चौर है… ही प्रचार मोहीम राबवली. देशात इतकी वर्ष काँग्रेसचे सरकार होते. भाजपा आणि त्यापूर्वी जनसंघ विरोधी पक्षाच्या भूमिकेत होता. परंतु कधीही विरोधाची पातळी इतकी घसरली नव्हती. यूपीएच्या काळात देशाने भ्रष्टाचाराचा कळस गाठला. तेव्हाही भाजपाने डॉ.मनमोहन सिंह यांच्याविरोधात ही भाषा वापरली नाही. या प्रचाराची अखेर राहुल गांधी यांनी न्यायालयासमोर माफी मागून झाली. ते त्यांचे आरोप सिद्ध करू शकले नाहीत.



