नेपाळमध्ये आंदोलकांनी पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांचा करेक्ट कार्यक्रम केल्यानंतर आता भारतातही तसे होऊ शकेल, असे मत इंडी आघाडीचे नेते व्यक्त करताना दिसतायत. जगातील कोणत्याही मुद्द्यावर विठू विठू करणारे महाराष्ट्रातील पोपटराव उर्फ सकाळचा भोंगाही तसाच बरळला आहे. जनतेत संताप आहे, याबाबत आम्ही ही सहमत आहोत. प्रचंड खदखद आहे. त्याचा भडका कधीही होऊ शकतो. जे चित्र नेपाळमध्ये दिसले ते भारतही दिसू शकते. एक गोष्ट स्पष्ट आहे की श्रीलंका, पाकिस्तान, बांग्लादेश आणि नेपाळमध्ये जे काही घडले त्या मागे परकीय हात असला तरी भ्रष्टाचार आणि बेबंदशाहीमुळे आधी जनता धुमसत होतीच. परकीय हाताने फक्त त्यात पेट्रोल ओतण्याचे काम केले. त्यानंतर जे काही घडले ते सर्वांसमोर आहे. बांगलादेशात जे काही घडले त्यानंतर अनेकांना उकळ्या फूटल्या होत्या. जनता लोककल्याण मार्गावर असलेल्या पंतप्रधान निवासाच्या बाहेर हातात मशाली घेऊन उभी आहे, नरेंद्र मोदींना बाहेर हुसकावण्यात येते आहे. अशी स्वप्ने अनेकांना पडायला लागली. खरे तर हा स्वप्नदोष होता. सोशल मीडियावरही अनेकांनी हाच धागा धरून सेलिब्रेशन करून घेतले. ते अजूनही संपलेले नाही. मुळात नेपाळ सह भारतीय उपखंडातील चारही देशात जे काही घडले त्याचे कारण काय होते? सर्वात मोठे कारण होते भ्रष्टाचार. या भ्रष्टाचाराच्या पैशातून नेत्यांच्या पोराबाळांची सुरू असलेली चैन. ही चैन भारतातील कोणत्या नेत्यांची मुले-बाळे करताना दिसतायत ? जनतेची उपासमार सुरू असताना जेव्हा राजा-राणी राजा राणी राजप्रासादात हनीमून कऱण्यात मश्गूल असतात. जनता जेव्हा उपासमारीची व्यथा घेऊन त्यांच्या दारी जाते आणि त्यांना ‘रोटी नसेल तर केक खा’ असे सल्ले दिले जातात तेव्हा राजप्रासाद जाळले जातात. हा इतिहास फ्रान्सचा असला तरी जनतेची ती मानसिकता मात्र जागतिक आहे. उपासमार, बेरोजगारीने पोळलेली जनता नेते मंडळींची अय्याशी सहन करू शकत नाही.



