शरीराला जेवढी रक्ताची गरज, तेवढीच देशाला तेलाची. तेल नाही तर सगळे काही ठप्प. तेलाच्या किमतींना आलेली उकळी हा जगभरात चिंतेचा विषय बनला आहे. भारत त्याला अपवाद कसा असेल? इस्त्रायल-इराण युद्धाची धग वाढल्यानंतर इराणने होर्मुझचा सामुद्रधनी बंद करण्याची धमकी दिलेली आहे. इराण हे करू शकेल की नाही, हा भाग वेगळा, परंतु जगात तेलाचे भाव चढायला सुरूवात झाली आहे. होर्मुझचा सामुद्रधनी जागतिक व्यापाराचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. एकूण जागतिक व्यापारापैकी सुमारे २० % व्यापार याच मार्गाने होतो. तेलाचे भाव उकळायला लागलेले आहेत. भारतीय अर्थकारणला दुष्काळातला हा तेरावा महिना भोवणार काय, हा महत्वाचा सवाल आहे.
