कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाची चार दिवसांची चांदणी आता उतरणीला लागली असून, विदेशी फंडिंगचे धागेदोरे समोर येत आहेत. जंतर मंतर आंदोलनादरम्यान विशिष्ट कंटेंट व्हायरल केल्याबद्दल प्रचंड पैसा मिळाल्याची कबुली मेटाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मेटाला हा पैसा कोणी दिला आणि देणाऱ्यांना तो कोणी पुरवला, याचा तपशीलही केंद्र सरकारच्या हाती आला आहे. काही पैसा परदेशातून आला आहे, तर काही देशांतर्गत मार्गांनी. नेपाळमध्ये झालेल्या जेन-झी क्रांतीमागे मेटाचा हात होता. तोच प्रयोग भारतात करण्याचा प्रयत्न सुरू होता, असे मानायला वाव आहे. मोदी विरोधकांची लवंग्यांची माळ तडतडली असून आता सरकारचे धमाके सुरू झाले आहेत. जगभरात कार्यरत असलेल्या अमेरिकन सोशल मीडिया कंपन्या अमेरिकन ‘डीप स्टेट’च्या इशाऱ्यावर नाचतात, ही बाब जगजाहीर आहे. अमेरिकेला नावडती झालेली सरकारे अस्थिर करण्यासाठी या कंपन्यांचा वापर केला जातो. नेपाळ आणि बांगलादेशात यशस्वी प्रयोग झाल्यानंतर अमेरिकन डीप स्टेटकडून भारतातही हा प्रयोग राबवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मोदी सरकार उलथवून टाकण्यासाठी पूर्ण ताकद लावली जात आहे. त्यासाठी लागणाऱ्या भाड्याच्या तट्टूंची देशात कधीच कमतरता नव्हती. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या निमित्ताने हे पुन्हा घडताना दिसत आहे. सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न होत आहेत. पंतप्रधानांचा व्हिडिओ तांत्रिक बिघाडाचे कारण सांगून गायब करण्यापर्यंत या परदेशी कंपन्यांची मजल गेली आहे.



