असं म्हणतात सत्य हे स्वयंप्रकाशित असते. ते कोणीही डागाळू शकत नाही. भारताचे लखलखीत यश डागाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन मूर्खांना सणसणीत थपडा पडल्या आहेत. त्यात भारताचे आईनस्टाईन राहुल गांधी आणि अमेरिकेचे ब़डबडराव डोनाल्ड ट्रम्प यांचा समावेश आहे. राहुल गांधी यांचा वोट चोरीचा दावाही जनतेने निकाली काढला आहे. खोट्याचा बाजार उठला आहे. याला म्हणतात सच्चे का बोलबोला, झूठे का मुह काला. भारत ही डेड इकोनॉमी आहे, असा दावा आधी ट्रम्प यांनी केला होता. राहुल गांधी यांनी त्यांची पिंक लगेचच झेलली. तेही भारताला डेड इकोनॉमी म्हणाले. २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या पहील्या तिमाहीचे आकडे जाहीर झाले आहेत. भारताने जीडीपीमध्ये ७.८ टक्के वाढ नोंदवली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आपण एकवेळ समजू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा माज कुरवाळत नाहीत. भारत त्यांच्या म्हणण्यानुसार व्यापार करार करत नाही, म्हणून ते तोंडाळपणा करतायत. भारत ही डेड इकोनॉमी आहे, असा दावा करतात. आश्चर्य तेव्हा वाटते जेव्हा कोणतीही आकडेवारी नसताना राहुल गांधी लगेच हा दावा शिरमाथ्यावर घेतात. भारतात जन्म झाल्यामुळे भारताबाबत आस्था निर्माण होते असे नाही. राहुल गांधी केवळ जन्माने भारतीय आहे. देशाचा मान, प्रतिष्ठा, गौरव, संस्कृती याच्याशी राहुल गांधींचे काही देणे घेणे नाही. ते असते तर त्यांनी ब्रिटीश नागरीकत्व स्वीकारले नसते. सतत भारताच्या विरोधात बरळले नसते. ट्रम्प यांच्या मनात मोदी आणि भारताबाबत जेवढा विखार आहे, त्याच्या काकणभर जास्तच राहुल गांधी यांच्या मनात असेल. त्यामुळे त्यांनीही भारताची इकोमॉमी डेड असल्याचे जाहीर करून टाकले.



