जागतिक राजकारण हा मेंदूला मुंग्या आणणारा विषय आहे. एका बाजूला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या गळ्यात गळे घालतायत, पाकिस्तानचे नेते अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल मायकल कुरीला यांचा निशाने एम्प्तियाज हा त्यांच्या देशातील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरवतायत आणि अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा, भारताच्या इस्त्रोसोबत हातमिळवणी करते आहे.
३० जुलै रोजी नासा (NASA) आणि इस्त्रोचा (ISRO )संयुक्त उपक्रम असलेल्या ‘नासा इस्त्रो सिंथेटीक एपर्चर रडार’ अर्थात ‘निसार’ या अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्पाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. अवघ्या पृथ्वीची १२ दिवसात फेरी मारण्याची क्षमता या उपग्रहात आहे. गेल्या काही वर्षात इस्त्रोचा लौकीक इतका वाढला आहे की अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासाला सुद्धा इस्त्रोसोबत काम करण्याचा वारंवार मोह होतोय.
३० जुलै रोजी दोन्ही अंतराळ संस्थांचा संयुक्त प्रकल्प असलेल्या निसारचा मुहुर्त ठरला आहे. ही भारत आणि अमेरिका या दोन देशांच्या अंतराळ संस्था, इस्रो आणि नासा यांची अत्यंत महत्त्वाकांक्षी संयुक्त उपग्रह प्रक्षेपण मोहीम आहे. पृथ्वीच्या पर्यावरणाचा आणि नैसर्गिक बदलांचा अभ्यास करण्यासाठी हा उपग्रह अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.



