28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरविशेषमाहेरची साडी रिलीजला ३० वर्षे पूर्ण

माहेरची साडी रिलीजला ३० वर्षे पूर्ण

Google News Follow

Related

काळ अतिशय वेगाने पुढे सरकतोय आणि त्यात काही यशस्वी आणि बहुचर्चित मराठी चित्रपटांनी तब्बल पंचवीस, तीस वर्षे पूर्ण कधी झाली हे समजलेच नाही. ‘माहेरची साडी’ या चित्रपटाला १८ सप्टेंबर रोजी तीस वर्षे पूर्ण होत आहेत. या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि वितरक विजय कोंडके हे आपल्या या पहिल्या दिग्दर्शनात राजश्री प्राॅडक्सन्सच्या सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित “मैने प्यार किया ” च्या यशाने लोकप्रिय ठरलेली भाग्यश्री पटवर्धनच ‘नायिका ‘ हवी म्हणून बरेच प्रयत्नशील होते. त्यानुसार तिची भेट घेऊन तिला त्यांनी या चित्रपटाची ऑफरही दिली आणि बराच काळ होकाराची वाट पाहून अखेर अलका कुबलला करारबध्द केले हे खुद्द विजय कोंडके तेव्हाही हे सांगत आणि आजही हे कबूल करतात. हा १९९१ सालचा सर्वाधिक यशस्वी मराठी चित्रपट आहे. पण अलका कुबलने तत्पूर्वी एन. एस. वैद्य दिग्दर्शित ‘लेक चालली सासरला ‘ ( १९८४) मध्ये साधारण ‘माहेरची साडी ‘सारखीच भूमिका साकारली असली तरी हा चित्रपट तिला खूपच मोठे यश आणि लोकप्रियता मिळवून देणारे ठरले.

अण्णासाहेब देऊळगावकर यांनी ‘माहेरची साडी ‘ची पटकथा आणि संवाद लिहिले. या चित्रपटाची मूळ कथा केशव राठोड यांची. त्यांच्या ‘माहेरनी चुनरी ‘ या राजस्थानी सुपर हिट चित्रपटाची ही मराठीत रिमेक होत होती. त्याची गुजराती रिमेकही लोकप्रिय झाली होती. हा तसा युनिव्हर्सल विषय. हुंड्यासाठी सासूकडून सूनेचा प्रचंड छळ होतो. इतका की, सासू तिला विहिरीत ढकलून देते आणि त्यात तिचा मृत्यू होतो….. समाजातील हे खूप मोठे वास्तव. वर्षानुवर्षे समाजात हुंडा बळीची सामाजिक समस्या कायम आहे. यावर अनेक भाषांत चित्रपट आले. आणि अशा अनेक चित्रपटांना उत्तम प्रतिसादही मिळाला. ही वस्तुस्थिती आहे.

दादा कोंडके यांच्या अनेक मराठी व हिंदी चित्रपटाचे दीर्घकालीन वितरण केल्याने राज्यातील खेड्यापाड्यातील प्रेक्षकांना नक्की काय आवडते याची विजय कोंडके यांना पूर्ण कल्पना होती. यशस्वी चित्रपट निर्माण करण्यासाठी हा घटक महत्वाचा आहे.

या चित्रपटाचे मध्यवर्ती कथासूत्र एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच. यात पती आणि पत्नी ( रमेश भाटकर व अलका कुबल) यांचे लग्न होते. तर सासू ( उषा नाडकर्णी) या सूनेचा जबरा छळ करते आणि त्यातच ती सूनेला विहिरीत ढकलते. एकूणच या चित्रपटाला प्रेक्षकांची प्रचंड सहानुभूती मिळाली. मग अंत्ययात्रा/अंत्यविधीप्रसंगी बॅकग्राऊंडला एक दर्दभरं गाणे. पब्लिक इमोशनल व्हायलाच हवा.

या चित्रपटात विक्रम गोखले, आशालता, अजिंक्य देव, किशोरी शहाणे, विजय चव्हाण, चारुशीला साबळे, भालचंद्र कुलकर्णी, अलका इनामदार ( हे दोघे सोशिक नायिकेचे दुर्दैवी माता पिता), राघवेन्द्र कडकोळ, आशा पाटील आणि जयश्री गडकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अतिशय उत्तम असा फॅमिली पॅक ड्रामा आणि उत्तम कलाकार संच. त्यामुळे चित्रपट अगदी वेळेत पूर्ण झाला. त्या काळात मराठी चित्रपटाच्या सेटवर कौटुंबिक वातावरण असे आणि ते चित्रपटाच्या पथ्यावर पडे.

जगदीश खेबूडकर यांच्या गीताना अनिल मोहिले यांचे संगीत आहे. यातील ‘सासरला ही बहिण निघाली भावाची लाडी नेसली माहेरची साडी ‘ हे गाणे मग प्रत्येक लग्नाला आवर्जून लाऊडस्पिकरवर लागायचे. तर ‘माझं सोनुलं सोनुलं माझं छकुलं, छकुलं बाळा स्वप्नात तुला दोन्ही डोळ्यांनी जपलं ‘ हे गाणे खेड्यापाड्यातील बारशाला हमखास लावले जाते. हा चित्रपट या गाण्यानीच तळागाळापर्यंत पोहचला.

विजय कोंडके यांच्याकडे संपूर्ण राज्यातील सर्व चित्रपटगृहांची त्यांचे भाडे, आसन क्षमता आणि आठवड्याचे उत्पन्न याची खडान खडा माहिती असल्याने आपला हा चित्रपट कशा पद्धतीने रिलीज करत करत जायचे याचे उत्तम प्लॅनिंग होते. आणि त्या काळात विभागवार चित्रपट प्रदर्शित होत. त्यानुसार विजय कोंडके यांनी सर्वप्रथम कोल्हापूर, इचलकरंजी आणि सांगली शहरात सिनेमा रिलीज केला. सुरुवातीला या चित्रपटाच्या फक्त तीनच प्रिन्ट अशा पध्दतीने रिलीज झाल्या. तेथे तुडुंब गर्दी झाल्याच्या बातम्या पश्चिम महाराष्ट्रातील अनेक लहान मोठ्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या, त्यामुळे सिनेमाची इतरत्र हवा निर्माण झाली. कुतूहल निर्माण झाले. मग पुणे शहरात प्रभात थिएटरमध्ये थिएटरमध्ये सिनेमा रिलीज केला. तेथेही हाऊसफुल्ल गर्दी. त्यात एक दृष्टिहीन चाहता सिनेमा ‘ऐकायला ‘ आला. त्याचा फोटो आणि बातमी सगळीकडे पसरली. तोपर्यंत गाणी हिट झाली होतीच. मग कोल्हापूरपासून मुंबईपर्यंत आणि सातारापासून पुण्यापर्यंत जेथे ‘माहेरची साडी ‘ लागला रे लागला की प्रत्येक शो हाऊसफुल्ल. काही ठिकाणी तर सकाळी नऊ वाजताचाही शो सुरु केला. दिवसात पाच खेळ आणि सगळे हाऊसफुल्ल. थिएटरमध्ये हा चित्रपट रिलीज केला होता तेथे अगोदर गाडी घ्या असे एस. टी.चे प्रवासी सांगत. खेड्यापाड्यातून अनेक प्रेक्षकांनी सायकल/बैलगाडी/स्कूटर/सितारा/टमटम/टेम्पो/ट्रक किंवा एस. टी. यापैकी जे मिळेल त्या वाहनाने थिएटरवर जाई आणि पुन्हा पुन्हा हा चित्रपट पाहत. काही ठिकाणी तर सर्व सीटस भरल्यावर खाली बसून अथवा बाजुला उभे राहून हा चित्रपट पाहिला जाई. अशा अनेक गोष्टी, किस्से, कथा, दंतकथा यांनी हा चित्रपट सतत फोकसमध्ये राहिला आणि त्याचे व्यावसायिक पातळीवरील यश वाढत राहिले.

मुंबई आणि पुण्यातील काही समिक्षकांनी या चित्रपटाला जाम झोडपले, धुपाटले, मराठी चित्रपट वीस वर्षे मागे गेला असेही काहीनी म्हटले. पण पिक्चरने सर्व समाज ढवळून काढला. सगळीकडे या चित्रपटाचीच चर्चा असे. पुणे शहरात प्रभात थिएटरमध्ये या चित्रपटाने तब्बल १२७ आठवडे मुक्काम केला. मुंबईत तर दादरच्या चित्रा थिएटरमध्ये हा चित्रपट तब्बल ७० आठवडे चालला. तसेच त्या काळात संपूर्ण राज्यात मिळून या चित्रपटाच्या तब्बल ७० प्रिन्ट्स प्रदर्शित झाल्या होत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रिन्टस हा मराठी चित्रपटासाठी नवीन विक्रम होता. राज्याबाहेर सुरत तसेच मध्य प्रदेशमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या सुवर्ण महोत्सवी इव्हेन्टसला खासदार अभिनेते सुनील दत्त व दादा कोंडके खास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दोघांचीही भाषणे रंगली. अंधेरीतील एका पंचतारांकित हाॅटेलमध्ये हा इव्हेन्टस रंगला.

या चित्रपटाच्या खणखणीत यशाने अलका कुबल स्टार होणे स्वाभाविक होतेच. त्या काळात ती विशेषतः ग्रामीण भागात कुठेही आपल्या अनेक मराठी चित्रपटाच्या सेटवर असली की तिला पाह्यला गर्दी वाढत जाई. एक प्रकारचे हे प्रेमच असतं. अनेक महिला तिला प्रचंड सहानुभूती दाखवत. आशीर्वाद देत. विचारपूस करत. याचे कारण म्हणजे ते तिला या चित्रपटातील भूमिकेत प्रत्यक्षात पाहत असत. आपल्याकडील चित्रपट रसिकांचा कायमच असा दृष्टिकोन असतो, त्याना पडद्यावरचा कलाकार आणि प्रत्यक्षातील माणूस वेगळा असतो हे लक्षात येत नाही. ही लोकप्रियता आणि रसिकांचे अफाट प्रेम अनुभवत असतानाच अलकाने छायाचित्रणकार समीर आठल्येशी लग्न केले. ( तर माहेरची साडीचा कॅमेरामन चारुदत्त दुखंडे आहे).

‘माहेरची साडी ‘ची हिंदीत रिमेक झाली. त्या चित्रपटाचे नाव होते, ‘साजन का घर ‘ आणि सुरेन्द्र बोहरा दिग्दर्शित या चित्रपटात त्यात ऋषि कपूर आणि जुही चावला यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अलका आठल्येला आज तीस वर्षे या चित्रपटाने सोशिक नायिका अशी ओळख मिळवून दिली आहे….ती तिला आजही उपयोगी पडतेय. आणि तीदेखिल याचा खास उल्लेख करते. एक सुपर हिट चित्रपट बरेच काही घडवत असतो ते हे असे आणि महत्वाचे आहे ते, प्रेक्षकांना एकदा का एकादा चित्रपट आवडला की ते जबरा डोक्यावर घेतात आणि त्यावेळी त्यांना कोणीही थांबवू शकत नाही. त्यानंतर चित्रपटाच्या नावात ‘माहेर’ असणे आणि त्यात अलका आठल्ये नायिका असणार असेही एक यशस्वी समीकरण झाले होते. ‘माहेरची माया ‘ , ‘माहेरचा आहेर ‘, ‘माहेरच्या बांगड्या ‘ वगैरे वगैरे नावाचे बरेच चित्रपट आले. या चित्रपटांना कमी अधिक प्रमाणात यशही प्राप्त झाले. विशेषतः ग्रामीण भागात अशा चित्रपटांचा आपला एक हुकमी प्रेक्षकवर्ग असतो.

‘माहेरची साडी ‘च्या गुणवत्तेबाबत वाद नक्कीच असतील, पण घवघवीत यशाबद्दल तर नक्कीच नाहीत. एकादा व्यवसाय वाढण्यासाठी अथवा रुजण्यासाठी यशाची गरज असतेच. ते ‘माहेरची साडी ‘सारखे चित्रपट घडवतात. आजही एकाद्या उपग्रह वाहिनीवर या चित्रपटाचे प्रक्षेपण उत्तम टीआरपी मिळवून देतोय हे विशेषच कौतुकाचे आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा