देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, १९ डिसेंबर रोजी दिल्लीत एक उच्चस्तरीय सुरक्षा बैठक होण्याची शक्यता आहे. ‘एएनआय’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. अधिकाऱ्यांनी एएनआयला सांगितले की, या बैठकीत जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीवर विशेष भर देऊन गंभीर सुरक्षा मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल. जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, ज्याचा उद्देश जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी धोरणांचा आढावा घेणे आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन, इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक तपन डेका, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्यासह वरिष्ठ लष्कर अधिकारी, सीएपीएफचे महासंचालक, मुख्य सचिव, जम्मू-काश्मीरचे डीजीपी आणि इतर वरिष्ठ अधिकारीही बैठकीत असणार आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षेच्या परिस्थितीबाबत शाह यांच्या अध्यक्षतेखाली जवळपास पाच महिन्यांनी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला सर्व उच्च अधिकारी उपस्थित राहतील अशी शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार नाविन्यपूर्ण मार्गाने दहशतवाद्यांचा मुकाबला करून आदर्श निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण आहे. मागील बैठकीत, गृहमंत्र्यांनी सुरक्षा यंत्रणांना जम्मू विभागात क्षेत्र वर्चस्व योजना आणि शून्य दहशतवादी योजनेद्वारे काश्मीर खोऱ्यात मिळालेल्या यशांची पुनरावृत्ती करण्याचे निर्देश दिले होते.
हे ही वाचा :
संभलमध्ये सापडले महादेव, हनुमानाचे मंदिर; ४६ वर्षांपासून होते बंद
“विधानसभेत पराभूत झालेले उद्धव ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा धरत स्टंटबाजी करतायत”
‘ओपनएआय’वर प्रश्न उपस्थित करणारे सुचीर बालाजी कोण होते?
‘स्टॅचू ऑफ युनिटी’चे शिल्पकार राम सुतार सिंधुदुर्गात उभारणार महाराजांचा पुतळा
अमित शाह यांनी यापूर्वीच्या बैठकांमध्ये सर्व सुरक्षा एजन्सींना मिशन मोडमध्ये काम करण्याचे आणि समन्वित पद्धतीने जलद प्रतिसाद सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर त्यांनी सुरक्षा एजन्सींमधील अखंड समन्वयावर, असुरक्षित क्षेत्रे ओळखणे आणि अशा क्षेत्रांच्या सुरक्षेची चिंता दूर करण्यावर भर दिला होता. दहशतवादाविरुद्ध शून्य-सहिष्णुता धोरणाचा पुनरुच्चार करताना, गृहमंत्र्यांनी अनेक प्रसंगी पुनरुच्चार केला आहे की सरकार जम्मू- काश्मीरमधून दहशतवादाचा समूळ उच्चाटन करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही.