छत्तीसगडमधील बस्तर जिल्हा नक्षलग्रस्त जिल्ह्यांच्या यादीतून वगळण्यात आला आहे. एकेकाळी बस्तर जिल्हा नक्षलवाद्यांचा गड म्हणून ओळखला जात होता. मात्र, आता येथून नक्षलवाद्यांच्या सर्व खुणा पुसल्या गेल्या आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने बस्तर जिल्ह्याला नक्षलवादी गटांच्या यादीतून काढून टाकला आहे. जवळजवळ चार दशकांनंतर, केंद्र सरकारने बस्तरला नक्षलवादापासून मुक्त घोषित केले आहे. सुरक्षा दलांनी अलीकडेच अनेक मोठ्या नक्षलवादी कमांडरना ठार केल्यानंतर आता केंद्र सरकारने ही घोषणा केली आहे. बस्तरचे जिल्हाधिकारी एस. हरीश यांनी याची पुष्टी केली.
बस्तरचे जिल्हाधिकारी एस. हरीश यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या या निर्णयाबाबत सांगितले की, या निर्णयामुळे बस्तरला नक्षलवादाच्या अंतर्गत दिली जाणारी आर्थिक मदत देखील थांबली आहे. १९८० च्या दशकापासून येथे नक्षलवाद फोफावत होता आणि तो इतका वाढला होता की जिल्ह्याचा विकास करणे कठीण होत चालले होते. तथापि, बस्तरच्या अंतर्गत भागात सुरक्षा दलांच्या सततच्या कारवाईमुळे बस्तर जिल्हा नक्षलमुक्त करण्यात आला.
सुरक्षा दलाच्या कारवाईत अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले तर अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपवण्याच्या घोषणेनंतर सुरक्षा दलाची त्याचप्रमाणे कारवाई सुरु आहे.
गृह मंत्रालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०१८ मध्ये देशभरातील १२६ जिल्हे नक्षलग्रस्त होते, जे जुलै २०२१ मध्ये ७० पर्यंत कमी झाले आणि एप्रिल २०२४ पर्यंत ही संख्या केवळ ३८ पर्यंत कमी झाली आहे. सर्वात जास्त प्रभावित जिल्ह्यांची संख्या देखील १२ वरून ६ वर आली आहे.
