उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात झालेल्या हिमस्खलनात मोठी दुर्घटना घडली आहे. माना गावात झालेल्या या दुर्घटनेत ५७ कामगार बर्फाखाली अडकले आहेत. यातील १० कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून इतर कामगारांना वाचवण्यासाठी घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी उत्तराखंडमधील बद्रीनाथ आणि त्याच्या आसपासच्या भागात झालेल्या हिमस्खलनात ५७ कामगार अडकले असून यातील किमान १० कामगारांना वाचवण्यात यश आले आहे. प्रशासन आणि बीआरओ टीमला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
आपत्ती व्यवस्थापन सचिव विनोद सुमन यांनी सांगितले की, बर्फ पडल्यानंतर ५७ कामगार गाडले गेले. तथापि, १० जणांना वाचवण्यात यश आले आहे. अपघाताच्या वेळी एका खाजगी कंत्राटदाराचे कामगार मोठ्या संख्येने घटनास्थळी काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्वजण बीआरओ कराराखाली काम करणाऱ्या कंत्राटदाराचे कामगार होते. जेव्हा हिमस्खलन झाले तेव्हा सर्वजण इकडे तिकडे धावू लागले. त्यापैकी काही जणांना वाचण्यात जाण्यात यश आले.
चमोलीचे जिल्हा दंडाधिकारी संदीप तिवारी यांनी अधिकाऱ्यांना बचाव कार्य करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या आहेत. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितले की, माना गाव आणि माना खिंडीदरम्यान हिमस्खलन झाल्याची नोंद झाली आहे. लष्कराच्या हालचालीसाठी रस्त्यावरून बर्फ काढणारे ५७ कामगार घटनेच्या ठिकाणाजवळ असल्याचे कळले आहे. या घटनेत अद्याप कोणत्याही जीवितहानीची माहिती नाही. लष्करासोबतच आयटीबीपी, एनडीआरएफ, एसडीआरएफच्या बचाव पथकांना घटनास्थळी पाठवण्यात आले आहे.
हे ही वाचा :
सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेले तुहिन कांत पांडे कोण आहेत?
पाणी पिण्यासाठी आला आणि… ७२ तासांनंतर दत्तात्रय गाडेच्या आवळल्या मुसस्क्या
वसंत मोरेंनी स्वारगेटमध्ये दाखवली पत्रकारितेची लक्तरे
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विट करून या अपघातावर दुःख व्यक्त केले आहे. “चमोली जिल्ह्यातील माना गावाजवळ बीआरओकडून सुरू असलेल्या बांधकामादरम्यान अनेक कामगार हिमस्खलनाखाली दबल्याची दुःखद बातमी मिळाली. आयटीबीपी, बीआरओ आणि इतर बचाव पथकांकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. सर्व कामगार बांधवांच्या सुरक्षेसाठी मी भगवान बद्री विशालकडे प्रार्थना करतो.” गेल्या दोन दिवसांपासून या भागामध्ये हवामान खूपच खराब असून बर्फवृष्टी होत आहे. उत्तराखंडसह, हिमाचल प्रदेशातील अनेक भागातही मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहत आहेत.







