बारामतीतील रेड बर्ड एव्हिएशन ट्रेनिंग अकॅडमीच्या अपुऱ्या व्यवस्थापनामुळे आणि वाढत्या विमान अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, याबाबत भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हाच्या वतीने केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे तक्रार सादर करण्यात आली आहे.
संस्थेच्या निष्काळजी व्यवस्थापनावर आरोप
गेल्या काही महिन्यांत या संस्थेच्या प्रशिक्षण विमानांचे अनेक अपघात झाले असून, काही अपघात शेती शिवारात किंवा लोकवस्तीत घडल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांनी संस्थेवर अपुरी देखभाल, प्रशिक्षकांची कमतरता, आणि विद्यार्थ्यांची अयोग्य तयारी असल्याचे आरोप केले आहेत.
विद्यार्थ्यांची बेजबाबदार वर्तणूक
स्थानिक नागरिकांच्या मते, प्रशिक्षणार्थी पायलट्सची वर्तणूकही सामाजिक शिस्तीला बाधक ठरत आहे. गोंधळ, ध्वनीप्रदूषण, वाहतूक नियमांचे उल्लंघन, आणि काही वेळा मद्यप्राशन करून गाडी चालवण्याचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी आहेत.
कायद्यात बदलाची गरज – वैभव सोलणकर यांची मागणी
भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस वैभव सोलणकर यांनी सांगितले की, “देशभरातील सर्व पायलट प्रशिक्षण संस्थांसाठी केंद्र सरकारने सुरक्षा, देखभाल, प्रशिक्षक पात्रता, आणि सामाजिक जबाबदारी यासंबंधी कडक नियमावली तयार करावी.”
तसेच, अपघातप्रवण संस्थांवर त्वरित चौकशी आणि कारवाई करण्याचीही मागणी त्यांनी केली.
केंद्रीय मंत्र्यांकडे तक्रार सादर
या तक्रारीसंदर्भात अधिकृत निवेदन मुरलीधर मोहोळ यांना देण्यात आले असून, तत्काळ चौकशी आणि आवश्यक ती कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे.
यावेळी भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष जगदीश कोळेकर, शहर अध्यक्ष विवेक साळुंके, युवा नेते संदीप केसकर, हिरामण लोंढे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
“बारामतीसारख्या संवेदनशील भागात अशा प्रशिक्षण संस्थांसाठी स्वतंत्र नियामक फ्रेमवर्क असणे गरजेचे आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.”
– वैभव सोलणकर, सरचिटणीस, भाजपा युवा मोर्चा, पुणे जिल्हा







