उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी फक्त एक दिवस शिल्लक असताना, के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय राष्ट्र समिती (BRS) आणि नवीन पटनायक नेतृत्वाखालील बिजू जनता दल (BJD) या दोन तटस्थ पक्षांनी मतदानापासून दूर राहण्याची घोषणा केली आहे. हे दोन्ही पक्ष राष्ट्रीय पातळीवर कोणत्याही आघाडीचा भाग नाहीत, ना एनडीएचा, ना इंडि आघाडीचा.
दोन्ही पक्षांनी म्हटले आहे की ते एनडीए आणि इंडिया ब्लॉक या दोन्हींपासून समान अंतर ठेवतील आणि उपराष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानात भाग घेणार नाहीत. भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) कार्यकारी अध्यक्ष के.टी. रामाराव यांनी सोमवारी (८ सप्टेंबर) स्पष्ट केले की, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत बीआरएसने मतदान न करण्याचा निर्णय हा तेलंगणातील शेतकऱ्यांच्या मनातील नाराजीचा आणि संतापाचा प्रतीक आहे.
त्यांनी सांगितले की, “राज्यात युरियाच्या तीव्र टंचाईमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. केंद्र सरकारकडून वेळेवर आणि पुरेसा पुरवठा न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. हा निर्णय त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठीच घेतला आहे.”
युरिया टंचाईचा प्रश्न सोडवण्यात भाजप आणि काँग्रेस दोघांनाही अपयश आल्याचा आरोप त्यांनी केला. युरियाचा तुटवडा इतका गंभीर आहे की रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्यांमध्ये हाणामारी होत आहे, असे केटीआर म्हणाले. “जर ‘नोटा’ (NOTA – None of the Above) पर्याय उपराष्ट्रपती निवडणुकीत उपलब्ध असता, तर आम्ही तो नक्कीच वापरला असता,” असे रामाराव यांनी सांगितले.
हे ही वाचा :
भारत टिकटॉकवरील बंदी उठवणार का?, मंत्री वैष्णव म्हणाले…
नेपाळमधील निदर्शनांनंतर सीमेवर अलर्ट!
इस्रायली संरक्षण धोरण तज्ज्ञ म्हणतात ‘ही’ गोष्ट मोदींकडून शिकण्यासारखी
हल्ल्याला इस्रायल देणार प्रत्युत्तर
बीजेडी नेते सस्मित पात्रा म्हणाले की, त्यांच्या पक्षाची प्राथमिकता ओडिशातील ४.५ कोटी जनता आहे. पात्रा म्हणाले, आमच्या पक्षाचे अध्यक्ष नवीन पटनाईक यांनी वरिष्ठ नेते, राजकीय व्यवहार समिती आणि खासदारांशी केलेल्या सल्ल्यानंतर, बीजेडीने उद्या होणाऱ्या उपराष्ट्रपती निवडणुकीतून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. ते पुढे म्हणाले, बीजेडी एनडीए आणि इंडि आघाडी या दोन्हींपासून समान अंतर राखत आहे. आमचे लक्ष ओडिशाच्या आणि त्याच्या ४.५ कोटी लोकांच्या विकासावर आणि कल्याणावर आहे.’







